प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:58 PM2021-04-27T22:58:59+5:302021-04-28T00:44:33+5:30
देवळा : मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच लसीकरण हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाकवच आहे. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी सवयी लावून घेण्यास भाग पाडले असून, यापुढेही सर्वांना त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
देवळा :मास्कचा वापर, स्वच्छता व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करण्याबरोबरच लसीकरण हे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षाकवच आहे. कोरोनाने आपल्याला अनेक आरोग्यदायी सवयी लावून घेण्यास भाग पाडले असून, यापुढेही सर्वांना त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वयंशिस्त हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तापसणी करून घ्यावी. कोरोना चाचणी करण्याची वेळ आली तर चाचणीचा अहवाल येण्यास काही वेळा उशीर होतो. चाचणी अहवाल आल्यानंतर उपचार सुरू करू, अशा मानसिकतेमुळे वाट पाहण्यात काही दिवस वाया जातात व आजार बळावतो. यासाठी लक्षणे दिसत असतील तर चाचणी अहवालाची वाट न पाहता डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णांनी वेळीच उपचार सुरू करून पुढील धोका टाळावा.
देवळा तालुक्यात खामखेडा, खर्डा, दहीवड, लोहाणेर, मेशी येथील आरोग्य केंद्र, तसेच देवळा व उमराणा येथील ग्रामीण रुग्णालयात संशयित रुग्णांना रॅपिड ॲन्टिजन टेस्ट, आर्टिफिशियल टेस्टची तसेच कोविड लसीकरण करण्याची सुविधा सुरू आहे. तालुक्यात सध्या उमराणे येथे २० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. देवळा येथे २० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे; परंतु अद्यापपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही. ऑक्सिजन सिलिंडर तीन ते चार दिवसात उपलब्ध होणार आहेत. यानंतर देवळा येथे ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू होऊन रुग्णांची गैरसोय दूर होईल.
- डॉ. गणेश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, देवळा.
लसीकरण करावे
१ मे पासून १८ वर्षे वयापुढील सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे. कोरोनाला आपण निश्चितच हरवू; परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, तसेच मास्कचा वापर करावा, सर्दी, खोकला, ताप आदींसारखी लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.