अनधिकृत गाळ्यांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:47 PM2017-10-11T16:47:08+5:302017-10-11T16:54:27+5:30

Check for unauthorized mills | अनधिकृत गाळ्यांची होणार तपासणी

अनधिकृत गाळ्यांची होणार तपासणी

Next
ठळक मुद्देफटाके विक्रीस मनाई : खुल्या जागांवरच मिळणार परवानगी


नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्री करण्यास बंदी घातल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शहरात आता अनधिकृत गाळ्यांची तपासणी केली जाणार आहे. रस्त्यालगत अथवा गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीस बंदी घालण्यात आली असून, खुल्या जागांवरच परवानगी देण्याचे धोरण महापालिकेने अवलंबिले आहे. दरम्यान, दीपोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना फटाके विक्रीबाबत गोंधळ सुरू असल्याने विक्रेते संभ्रमात पडले आहेत.
दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही निवासी भागात फटाके विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. महापालिकेने यंदा सुरुवातीपासूनच खुल्या जागांवर फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार, महापालिकेने गेल्या सोमवारी (दि.९) शहरातील सहा मैदानांवरील २५५ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. परंतु, या लिलाव प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत अवघ्या १५ गाळ्यांनाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे लिलाव प्रक्रिया तहकूब करण्यात आली होती. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाने आणखी सुमारे ३८० जागांसाठी परवानगी दिल्यानंतर विविध कर विभागामार्फत त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, मंगळवारी (दि.१०) उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाके विक्रीस बंदी घालण्याचा निकाल दिला. त्यामुळे, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आता केवळ खुल्या जागांवरच परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. परवानगी न घेता निवासी तसेच गर्दीच्या भागात फटाके विक्री होत असल्यास त्याबाबतची तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांनी दिली. रस्त्यालगत अथवा गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्रीला बंदी घालण्यात आली असून, मैदानांवर गाळे उभारणीबाबतही नियमावलीच्या आधारे परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान, शहरात मध्यवस्तीतील ठक्कर बाजारामधील गाळ्यात थाटलेल्या एकाच दुकानाची महापालिकेकडे अधिकृत म्हणून नोंद आहे. अन्य दुकाने अनधिकृत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. सदर दुकानांना परवानगी नाकारण्याचे अधिकार पोलीस आयुक्तालयाचे असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.

Web Title: Check for unauthorized mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.