कसमादेला डाळिंबाने फसविले, कांद्याने रडविले!

By Admin | Published: April 24, 2017 01:00 AM2017-04-24T01:00:45+5:302017-04-24T01:00:59+5:30

जिल्ह्याचे मुख्य पीक व कसमादेचे महत्त्वाचे पीक अशी ओळख असलेल्या डाळिंबावर तेल्या रोग आल्याने डाळिंबाचे फळ आता दिसेनासे झाले आहे.

Chestnut cheated by pomegranate, onion roasted! | कसमादेला डाळिंबाने फसविले, कांद्याने रडविले!

कसमादेला डाळिंबाने फसविले, कांद्याने रडविले!

googlenewsNext

 शरद नेरकर नामपूर
जिल्ह्याचे मुख्य पीक व कसमादेचे महत्त्वाचे पीक अशी ओळख असलेल्या डाळिंबावर तेल्या रोग आल्याने डाळिंबाचे फळ आता दिसेनासे झाले आहे. कसमाच्या शेतकऱ्यांची संजीवनी यामुळे लोप पावली असताना, कांद्यालाही उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळाल्याने ‘डाळिंबाने फसविले, तर कांद्याने रडविले’ अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. या पट्ट्यात तेल्यानेही आता आंबा व शेवग्यावर प्रादुर्भाव केला आहे. त्यामुळे आंबा व शेवगा उत्पादक धास्तावले आहेत.
पंधरा वर्षांपूर्वी कसमा पट्ट्यातला शेतकरी तसा आर्थिक दुर्बल होता! कांदा, भुईमूग, बाजरी, गहू ही महत्त्वाची पिके होती, तर ऊस हे थोडा जास्त पैसा देणारे पीक होते. त्यावेळी या भागात पाणी पातळी स्थिर होती. मात्र साधारणत: १९९८-९९ सालापासून पाणी पातळी खालावल्याने उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाला डावलत शेतकरी डाळिंब पिकाकडे वळले.
डाळिंब हे रांगडे पीक, दगडी वजनाचे पीक, कमी श्रमाचे पीक आणि भरपूर पैसा देणारे पीक म्हणून या पिकाने मोसम पट्ट्याला दहा वर्षांत श्रीमंत बनविले. उच्च जीवनमानाचा दर्जा मिळवून दिला. डाळिंबापासून मिळणाऱ्या पैशातून बळीराजाने चांगली घरे बांधली, महागडी वाहने खरेदी केली. एका आनंदी जीवनपर्वाला शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती.
मात्र काही महिन्यात नव्हे; दिवसात तेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण टाकले. मांडवावरचा डाळिंब तेल्याने खाऊन टाकला. बळीराजाच्या नव्या पर्वाचा अस्त झाला. कसमा पट्ट्यातील समृद्ध जीवन तेल्याने भकास करून टाकले. अनेक तरुण शेतकऱ्यांना या तेल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले. परिणामी अनेकांनी डाळिंबाच्या बागा उपटून फेकल्या.
सध्या डाळिंबांची ही अवस्था असताना त्यात मार्ग काढत काही शेतकरी तेल्यावर मात करून डाळिंब पीक घेताना दिसत आहेत. मात्र भावातील प्रचंड घसरणीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे.
यावर्षी डाळिंबाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारितही भाव मिळाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. तेल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी डाळिंब बागाच उपटून टाकल्या. मोसमपट्टाच नव्हे, तर कसमादे पट्ट्यातील शेतकरी पूर्वापार कांदा पिकाचे उत्पादन घेतो. कसमादेचा कांदा म्हटला तर डोळ्यात पाणी व नाकात झणझण्या आणणारा असतो. त्यामुळे या भागातील कांद्याची ही विशेष ओळख आहे. बाहेर राज्यातूनही येथील कांद्याला विशेष मागणी असते. यंदा कांद्याचे उत्पादन भरपूर आहे. उत्पादन जरी भरपूर असले तरी भाव मात्र खूपच कमी आहेत.
यंदा दुष्काळी स्थिती आहे, उत्पादन कमी राहील असा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकला. मार्केटमध्ये प्रचंड आवक आहे व भाव मात्र खूपच कमी आहे. सध्या ४५० ते ६५० एवढा कांद्याचा भाव सुरू आहे. उत्पादन खर्चावर आधारित हा भाव नाही. हा भाव अत्यल्प आहे. आज उत्पादन खर्चावर आधारित कांद्याचा भाव साधारणत: ६०० रुपये आहे. मजूर मिळत नाही; मिळालेच तर त्यांच्या मजुरीचे दर मोठ्या प्रमाणावर आहेत.
शेतातील पिकांना खते देणे आवश्यक असते. मात्र ही खते आज वाढलेल्या किमतीमुळे न परवडणारी झाली आहेत. कांदा पीक असे आहे की त्याला घट मोठ्या प्रमाणावर आहे. कांदा चाळीत टाकल्यापासून तर चाळीच्या बाहेर काढण्यापर्यंत ३० टक्के घट येते. म्हणून हमखास उत्पादनाचे मुख्य पीक कांदा हे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणून आता शासनानेच कांद्याला १५०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
कांदा पिकाला मिळणाऱ्या कमी भावामुळे हे पीक घेणे शेतकऱ्याला परवडत नाही. कांद्याचा उत्पादन खर्च जर ५०० ते ६०० रुपये असेल आणि भाव जर ४०० रुपये मिळत असेल तर शेतकऱ्याला हे पीक परवडेल तरी कसे? उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. कर्जाचा डोंगर सतत वाढत राहतो व यात भविष्य धूसर होत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येस सामोरे जावे लागते. यामुळे सर्व कुटुंबच उद्ध्वस्त होते. कृषिप्रधान देशातल्या बळीराजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या पिकांना हमीभाव देणे आवश्यक असल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

Web Title: Chestnut cheated by pomegranate, onion roasted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.