"येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली"; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर
By संदीप भालेराव | Published: July 9, 2023 04:32 PM2023-07-09T16:32:50+5:302023-07-09T16:35:36+5:30
राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली.
नाशिक - शरद पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता. परंतु येवल्याच्या विकासासाठी आणि तेथील जनतेच्या आग्रहामुळे येवला मतदारसंघाची मी निवड केली. खरेतर तेथून लढण्यात रिस्क होती तरीही येथून निवडून आलो. त्यानंतर जनतेने सलग चार वेळा मोठ्या मतधिक्क्याने निवडून दिले. तरीही पवार साहेब येवल्यात येऊन चुकीचा उमेदवार दिला असे म्हणून माफी मागत असतील तर पवार यांना याचा विसर पडल्याचे दिसते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
येवल्यात येऊनच सभा घेण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी शरद पवार यांना विचारला. राष्ट्रवादीतील अजित पवार गटात मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघातून शरद पवार यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. शनिवारी (दि.८) पवार यांनी येवल्यात सभा घेत भुजबळांना येवल्यातून उमेदवारी दिल्याची आपली चूक होती याबद्दल मी मतदारांची माफी मागतो, असे विधान सभेत केले होते. त्यास भुजबळ यांनी रविवारी (दि.९) उत्तर दिले.
२००४ मधून उमेदवारीसाठी एरंडोल, वैजापूर, मुंबई, जुन्नर, लासलगाव आणि येवला येथूनही आपणाला विचारणा केली जात होती. येवल्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीदेखील आपणास येवल्याच्या विकासासाठी लढण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी पवार यांनी आपणास जुन्नर मतदारसंघातून लढण्याचा सल्ला दिला होता. परंतु मी येवल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्राबल्य असताना या मतदारसंघातून लढण्याची रिस्क घेतली आणि निवडून आलो. त्यामुळे शरद पवारांनी आपणास येथून उमेदवारी दिली असे नाही तर मी स्वता:च येवल्याची निवड केली होती, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी यावेळी दिले. येवल्यातील विकासाचे कौतुक स्वत: शरद पवार यांनी केले होते. याचा विसर त्यांना पडल्याचे भुजबळ म्हणाले.