छगन भुजबळ यांची शासकीय अधिकाऱ्यांना तंबी
By श्याम बागुल | Published: December 26, 2019 07:01 PM2019-12-26T19:01:57+5:302019-12-26T19:05:16+5:30
Metro Project : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शनही घडले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौ-यावर आलेले ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासकीय कामकाजाचा आढावा व विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतानाच अधिका-यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन योजना व प्रस्ताविक मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अधिका-यांनी कर्तव्याचे भान ठेवावे, अशा शब्दात भुजबळ यांनी जाहीरपणे तंबी दिल्याने शासकीय अधिका-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शनही घडले आहे. मात्र पाच वर्षांनंतर पुन्हा परिस्थिती बदलताच, नाशिक दौ-यावर आलेल्या छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात सर्वच अधिका-यांनी पायधूळ झाडण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिपद धारण केल्यानंतर पहिल्याच जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भुजबळ यांचा अधिका-यांच्या वर्तनाप्रती असलेला रोष व्यक्त झाला. गेल्या सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी साडेसहाशे कोटी रुपये जाहीर झालेले असताना दोनशे कोटीच वाटण्यात आले, उर्वरित चारशे कोटी कुठे गेले असा जाहीर सवाल विचारतानाच भुजबळ यांनी महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, त्यासाठी शासनाकडून दिला जाणाºया निधीला इकडे, तिकडे वाटा फुटणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना नागरिकांसमक्ष दिल्या. एवढ्यावरच भुजबळ थांबले नाहीत तर प्रस्तावित शिवभोजन योजनेची यशस्वीता अधिका-यांवर अवलंबून असल्याचे सांगून अधिकारी, मंत्र्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण सामान्य जनतेसाठी करण्यात आले होते याची आठवण करून दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देत भुजबळ यांनी, लोकप्रतिनिधींनी नको म्हणायला तर अधिका-यांनी होय म्हणायला शिकले पाहिजे, असे यशवंतराव चव्हाण सांगत होते. आता मात्र लोकप्रतिनिधी होय म्हणतात आणि अधिकारी नको म्हणतात ही परिस्थिती मात्र आता बदलावी लागेल, असे जाहीरपणे सुनावले. आपल्या अर्ध्यातासाच्या भाषणात भुजबळ यांनी अधिका-यांच्या कामकाजावरच अधिक जोर दिल्याने व्यासपीठावर बसलेल्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये चुळबूळ दिसून आली.
चौकट===
माझा विकासाला विरोध नाही
माझा कोणत्याही विकास कामाला विरोध नाही, असे स्पष्ट करून भुजबळ यांनी नाशिकमध्ये विकासाची अनेक कामे २०१४ पूर्वी आपण केली आहेत. काही कामे मधल्या काळात रखडली मात्र, आता पुन्हा जोमाने ती कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. समाजाला काय हवे याचा शांततेत अधिका-यांनी विचार करून प्रकल्प राबवावेत, अशी सूचना करून नागपूरचा मेट्रो प्रकल्प कसा फेल गेला याची माहिती भुजबळ यांनी उपस्थितांना दिली. विकासकामे करताना त्याची व्यवहार्यता, समाजाला होणारा लाभ व शहराचे सौंदर्य अबाधित कसे राहील याचा विचार अधिका-यांनी करावा असे सांगून, भुजबळ यांनी अधिका-यांना उद्देशून ‘मी विकास करणारा माणूस आहे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.