"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:30 PM2024-10-25T14:30:59+5:302024-10-25T14:35:37+5:30
Chhagan Bhujbal VS Suhas Kande : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Yevla Assembly constituency : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर नांदगावचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी थेट छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यावेळी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत भुजबळ यांनी अपक्ष उमेदवरी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास कांदे आणि भुजबळ यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. येवला मतदारसंघात निवडणूक लढण्याची घोषणा करत सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी अद्यापही सुरू आहे. ही याचिका भुजबळ यांच्यासाठी अडचणीची आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट चुकीची आहे, असं सुहास कांदे यांनी म्हटलं
सुहास कांदेंनी केलेल्या आरोपांना आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "सुहास कांदेंच्या म्हणण्याला आम्ही कोर्टात उत्तर देऊ. मला काहीही नोटीस आलेली नाही. त्यांनीच आता कबुल केले की खटल्यातून सुटल्यानंतर ते वारंवार अपिल करत आहेत. महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत तरी आमच्या विरोधात जाण्याचे कारण नाही. ते काय एका दिवसात आमच्या विरोधात गेलेले नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
भुजबळांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचेच हा माझा संकल्प - सुहास कांदे
"भुजबळांवरील याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती. मला पैशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. मात्र, मी त्याला बदलणार नाही. या धमक्यांनंतरही मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही,भविष्यातही घेणार नाही. त्यामुळेच भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत, हा राग काढण्यासाठीच त्यांनी माझ्यावर विविध आरोप केले. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी शिक्षा म्हणून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचेच हा माझा संकल्प आहे. त्यापासून मला कोणीही विचलित करू शकणार नाही," असंही सुहास कांदे म्हणाले होते.