मनुवाद्यांकडून घटनेला नख लावण्याचा प्रयत्न : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:21 AM2018-11-25T01:21:20+5:302018-11-25T01:22:15+5:30
नाशिक : देशात स्वातंत्र्य समता व बंधुता प्रस्थापित करणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेस सत्ताधारी मनुवादी हे नख लावण्याचा प्रयत्न ...
नाशिक : देशात स्वातंत्र्य समता व बंधुता प्रस्थापित करणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेस सत्ताधारी मनुवादी हे नख लावण्याचा प्रयत्न करीत असून, घटनेत बदल न करता तिचे उल्लंघन करण्याचे काम सतत सुरू आहे़
बहुजन समाजात भांडणे लावून राज्य करू पाहणाºया या मनुवाद्यांना डॉ़ आंबेडकर यांच्याच शिका, संघटित व्हा व संघर्ष करा यानुसार लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी केले़ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे शनिवारी (दि़२४) शहरातील शालिमार येथे आयोजित संविधान जागर सभेत ते बोलत होते़ भुजबळ म्हणाले की, संपूर्ण जगाने मान्य केलेल्या भारतीय संविधानाने देशातील कोट्यवधी लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे़ फुले, शाहू, आंबडेकर यांनी घालून दिलेले समतेचे चक्र उलट्या दिशेने फिरविण्याचे काम मनुवादी सत्ताधारी करीत आहेत़ डॉ़ आंबेडकरांची घटना बदलण्यासाठीच आमची सत्ता असल्याचे वक्तव्य मंत्री करतात़ बहुजनांचे अधिकार कमी करण्याचा त्यांचा कट असून, राजधानी दिल्लीत संविधान जाळले जाते, मात्र गुन्हा दाखल होत नाही़, तर दुसरीकडे संभाजी भिडेसारखे मनुवादी आंब्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला पुन्हा अंधश्रद्धेकडे घेऊन जात आहेत, त्यामुळेच संविधान जागर हा महत्त्वाचा आहे़
शिक्षण, संपत्तीचा अधिकार नाकारणारा तसेच महिला व माणसांना जनावरांसारखी वागणूक देणाऱ्या मनुग्रंथ जाळण्याचे काम यापुढे समता परिषदेच्या कार्यक्रमात प्रथम केले जाईल़ देशाची घटना अखेरपर्यंत मजबुत ठेवण्यासाठी मनुवाद्यांना खाली खेचण्याचे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले़
राष्टीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी संविधान जागर सभा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू सांगितला़
यावेळी व्यासपीठावर अॅड़ रवींद्र पगार, नगरसेवक कविता कर्डक, पोपटराव सोनवणे, अशोकराव भोगले, लक्ष्मीकांत बेडसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़ कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी साजन बंद्रे व त्यांच्या सहकाºयांनी सादर केलेल्या भीमगीतांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ यावेळी गिरीश अकोलकर, बाबासाहेब साळवे, प्रशांत कटारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़