छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 02:42 AM2019-09-09T02:42:05+5:302019-09-09T02:42:28+5:30
भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली
धनंजय वाखारे
नाशिक : सातत्याने दुष्काळ पाचवीला पुजलेल्या येवला मतदारसंघाचे गेली तीन टर्म विधानसभेत नेतृत्व करणारे राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची चौथ्यांदा विधानभवनाच्या पायऱ्या चढताना दमछाक होणार आहे.
आघाडी सरकारच्या काळात दबदबा असलेल्या भुजबळांचा करिश्मा मात्र यंदा ओसरल्याचे चित्र असून, त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच त्यांचे निकटचे सहकारी माणिकराव शिंदे यांनी जाहीर आव्हान दिले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने या मतदारसंघात शिवसेना इच्छुकांबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली होती. मध्यंतरी भुजबळ हे मतदारसंघ बदलून वैजापूर मतदारसंघातूनही लढण्याची चर्चा सुरू होती.
भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली असून गेल्या महिनाभरापासून त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांसंबंधी घातलेले लक्ष, सुरू केलेले पाहणी दौरे, मांजरपाडा प्रकल्पाबाबत श्रेयवादाची सुरू असलेली लढाई पाहता भुजबळ हेच पुन्हा राष्टÑवादीचे उमेदवार असतील, असे चित्र आहे. भुजबळांनी शिवसेनेची वाट धरली असती तर मतदारसंघात राजकीय समिकरणे बदलली असती. भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेत एकापेक्षा एक उमेदवार इच्छुक असून भुजबळांना यंदा कडवी लढत द्यावी लागणार आहे. भुजबळांसमोर स्वपक्षातून उभे राहिलेले आव्हान, गेल्या पाच वर्षात विरोधकांची मजबूत होत गेलेली फळी आणि अॅण्टी इन्क्बन्सीचा कितपत प्रभाव पडतो यावर छगन भुजबळ यांचे भवितव्य येत्या निवडणुकीत अवलंबून असणार आहे.
पाच वर्षांत काय घडले?
छगन भुजबळ यांनी मतदारसंघात हॅट्ट्रिक केली; परंतु, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ते तब्बल २६ महिने कारागृहात होते. या काळात कारागृहात राहून त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसंबंधी शासनाशी पत्रव्यवहार केला होता.
आघाडीच्या सत्ताकाळात मतदारसंघाचा जो विकास झाला त्याची गती मात्र गेल्या पाच वर्षात मंदावली.
२०१७ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातून सत्ता हस्तगत केली. पंचायत समितीत शिवसेनेने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. जिल्हा परिषद निवडणुकीत पाचपैकी तीन जागांवर विजय मिळवत शिवसेनेने वर्चस्व राखले.
मतदारसंघातील पाणी, रस्ते यासारखे मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम अद्याप झालेले नाही.बंधाऱ्यांची कामे रखडलेली आहेत. तालुक्यात पावसाळ्यातही पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. विकासाचा अनुशेष अजूनही भरलेला नाही. - संभाजी पवार, पराभूत उमेदवार, शिवसेना