भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:07 PM2018-05-04T16:07:35+5:302018-05-04T19:33:14+5:30
दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाल्याने त्याचे परिणाम विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी जामीन नामंजूर झाल्यामुळे भुजबळ यांचा तुरूंगातील मुक्काम वाढत गेल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये व विशेषत: राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये मरगळ निर्माण झाली होती. भुजबळ तुरूंगात असतानाच्या काळातच नाशिक महापालिकेची व जिल्हा परिषद अशा दोन मोठ्या निवडणुका त्यांच्या गैरहजेरीत पार पडल्या त्यात प्रामुख्याने त्यांची उणिव सर्वांनाच भासली, परिणामी या दोन्ही निवडणुकीत राष्टÑवादीची कामगिरी जेमतेम राहीली. राज्यात विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असतानाच शुक्रवारी छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने आता या निवडणुकीतील गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्टÑवादीने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेकडून नरेंंद्र दराडे रिंगणात आहेत. दराडे हे येवल्यातील असून, एकेकाळी त्यांनी येवला मतदार संघ जागा वाटपात राष्टÑवादी कॉँग्रेसला सोडल्याच्या निषेधार्थ जिल्हा कॉँग्रेस कमिटीसमोर उपोषण केले होते. परंतु तरिही भुजबळ यांनाच येवल्यातून उमेदवारी मिळाली व काही काळानंतर दराडे यांनी भुजबळ यांच्याशी जुळवूनही घेतले होते. गेल्या दोन वर्षापासून भुजबळ तुरूंगात गेल्याचे पाहून दराडे यांनी येवल्यातून विधान सभेची निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. राज्यातील सत्तांतरानंतर दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने दराडे यांचे येवल्यातील वर्चस्व वाढणे भुजबळ यांना राजकीय दृष्ट्या धोकेदायक ठरू शकत असल्याने कोणत्याही परिस्थितीत दराडे यांना रोखण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केला जाणे साहजिकच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचे समिकरणे भुजबळ यांच्यामुळे बदलण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.