इगतपुरीत उत्तर भारतीयांतर्फे छट पुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:42 PM2018-11-14T17:42:25+5:302018-11-14T17:43:18+5:30
इगतपुरी येथील नगरपरिषदेच्या तलावाजवळ उत्तर भारतीयांतर्फे छटपुजेचा सण उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
छट पुजेसाठी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपासून उत्तर भारतीय महिला, बांधवांनी इगतपुरी नगरपरिषदेच्या तलावावर गर्दी केली होती. सुर्यास्ताच्या काही वेळ अगोदर महिलांनी पाण्यात उभे राहुन विणलेल्या सुपात मिष्ठान्न तसेच छटपुजेसाठी ऊसाच्या खुपटीमध्ये पाच प्रकारचे फळ, मध, अत्तर, नारळ, देवीची प्रतिमा ठेवून सूर्यासमोर दिवा पेटवून ‘छठी माता की जय’ चा जयजयकार करून पुजा केली.
शहरात अनेक वर्षात ही छट पुजा पहिल्यांदाच साजरी झाल्यामुळे उत्तर भारतीय व शहरातील अनेक महिला, बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. महिलांच्या गर्दीमुळे शहर व तलाव परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. पहिल्याच वर्षी छठी मातेची पुजा यशस्वी झाल्याने पुढच्या वर्षीही छट पुजा मोठ्या स्वरूपात व विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करू असे मनोगत आयोजक शिवसेना शहर उपप्रमुख संदीप शर्मा यांनी व्यक्त केले. छटपुजेला महिला निर्जल उपवास करतात. तर काही महिला सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत पाण्यात रात्रभर पाण्यात उभे राहून सुर्य देवतेची आराधना करतात. याप्रसंगी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, योगेश गवळी, मुन्ना गुप्ता, शुभ नारायण यादव, रामगोविंद यादव, एस. पी. यादव, बलराम रॉय, शंभुनाथ प्रसाद, रमेशकुमार शर्मा, यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख अलका चौधरी, जयश्री जाधव, सायली शिंदे, शितल चव्हाण, परिणिती मेस्त्री, संघटक जयश्री शिंदे, सुरेखा मदगे, सौ. कदम, फरजाना शेख, सुनंदा महाजन, आदींनी उत्तर भारतीयांना छट पुजेनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोरंजनासाठी आॅर्केस्टाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देवी देवतांसह सुर्यदेवतेची मराठी, हींदी, भोजपुरी गीते सादर करण्यात आली.