आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:27 AM2022-02-09T01:27:30+5:302022-02-09T01:28:00+5:30

शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Chhatrabharati's sit-in agitation in front of Adgaon hostel | आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

आडगाव वसतिगृहासमोर छात्रभारतीचे ठिय्या आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देवसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक

नाशिक : शहरातील सर्व वसतिगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) सकाळी ११.०० वाजेपासून छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे आडगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाशिक समाजकल्याण विभाग वसतिगृह विद्यार्थ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्यातील वसतिगृह सुरू करण्याचा आदेश दिलेला असतानाही अद्याप नाशिक शहरात समाजकल्याण विभागाने सुरू केलेले नाही, महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध भरती परीक्षा आणि एमपीएससीच्या परीक्षा सुरू असताना वसतिगृह बंद ठेवून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोपही छात्रारतीने केला आहे. संघटनेतर्फे यासंदर्भात मागील १५ दिवसांपासून उपायुक्तांना विद्यार्थी संघटनांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात आणून दिली होती. मात्र, वसतिगृह सुरू करण्याबाबत कोणतीही कारवाई न करता टाळाटाळ केल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांकडून केला असून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार होत नसल्याने मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ठिय्या आंदोलन करीत आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला. या ठिय्या आंदोलनात छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार, राज्य सचिव समाधान बागूल आणि शहराध्यक्ष देवीदास हजारे वसतिगृह विद्यार्थी प्रशिक सोनवणे, आकाश सावकार, विनय मोरे, ऋषिकेश आंधळे, आकाश पठारे, नकुल जमाव, विजय गांगुर्डे, अक्षय निकम यांच्यासह सर्व विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कल्याणकारी योजनांमध्ये समाजकल्याण विभाग अपयशी

समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना २०१९ पासून निर्वाह भत्ता मिळालेला नसल्याचे नमूद करतानाच शैक्षणिक शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, मागील २ वर्षांपासून स्वाधार योजनेचा निधी वितरित केलेला नाही, वसतिगृह विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी वेळेत जाहीर केली जात नाही, अशा विविध मागण्यांबाबत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील समाजकल्याण विभागाने दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात समाजकल्याण विभाग अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीतर्फे आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी दिली आहे.

Web Title: Chhatrabharati's sit-in agitation in front of Adgaon hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.