सुहास कांदेंसह छोटा राजनचा पुतण्याला पोलीस बजावणार समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:18 AM2021-10-01T01:18:38+5:302021-10-01T01:19:47+5:30
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना फोनवरून थेट छोटा राजन टोळीकडून धमकी मिळाल्याचा प्रकार कांदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, कारण या तक्रारअर्जामागे भुजबळ यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी असल्याने महाविकास आघाडीचे दोन्ही नेते आमने-सामने आले. धमकी प्रकरणाची पोलीस आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जाबजबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना फोनवरून थेट छोटा राजन टोळीकडून धमकी मिळाल्याचा प्रकार कांदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, कारण या तक्रारअर्जामागे भुजबळ यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी असल्याने महाविकास आघाडीचे दोन्ही नेते आमने-सामने आले. धमकी प्रकरणाची पोलीस आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जाबजबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून कांदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भुजबळ यांनीही कांदे यांच्यावर पलटवार करत ‘मी भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नसल्याचा टोला लगावला तसेच कांदे यांनी खोटे आरोप केल्याने त्यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले. दरम्यान, कांदे यांनी भुजबळांविरुद्ध उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करीत न्याय मागितला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२७) सायंकाळी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करून न्यायालयातील रीट पिटिशन मागे घेण्यासाठी दबाव टाकत फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कांदे यांनी तक्रारअर्जात केला. बुधवारी अक्षय निकाळजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत कांदे हे स्टंटबाजीसाठी खोटे आरोप करत असल्याचे सांगत भुजबळांशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. तसेच टोल नाक्यावर झालेल्या वादासंदर्भात कांदे यांना फोन केल्याचे निकाळजे म्हणाले. यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. तक्रारीची शहानिशा करत मोबाइल कॉल डिटेल्स, टोल नाक्यावरील मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुरावे पोलिसांकडून संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.
--इन्फो--
चौकशीकडे लागले सर्वांचे लक्ष
कांदे-भुजबळ यांच्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून आता पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता चौकशीनंतर काय सत्य समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कांदे यांच्याकडून करण्यात आलेले आरोपांमध्ये कितपत सत्य आहे आणि धमकीचा फोन हा खराखुरा आला की केवळ स्टंट होता? हे या चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पाण्डेय यांनी चौकशीचे आदेश देत संपूर्ण माहिती व पुरावे संकलित करण्याचे फर्मान सोडले आहे.