चिचोंडी गणात महिलाराज
By admin | Published: January 28, 2017 12:55 AM2017-01-28T00:55:43+5:302017-01-28T00:55:54+5:30
चिचोंडी गणात महिलाराज
दत्ता महाले येवला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजून आरक्षण जाहीर झाल्याने व त्यात चिचोंडी गण सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने अनेक जिगरबाज नेतेमंडळींना आपल्या सौभाग्यवतींना अथवा घरातील महिलेला संधी देऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या राजकारण करावे लागणार हे मात्र निश्चित झाले आहे.
चिचोंडी गण या जागेवर महिलांचे आरक्षण राहिल्याने शहरालगतच्या गणात महिलाराज अवतरणार आहे. या गणाचा जास्तीत जास्त संपर्क येवला शहराशी असून, येवल्यातील दिग्गज नेत्यांचे नातेगोत्याचे जाळे या गणात मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. या भागात मराठा बहुतुल शेतकरी मतदार असून, प्रमुख नगदी पीक कांदा व मका आहे.
या गणात चिचोंडी खुर्द, चिचोंडी बु।।, अंगणगाव, पारेगाव, निमगाव मढ, बदापूर, रायते, एरंडगाव बु।।, एरंडगाव खु।।, पुरणगाव, साताळी, भाटगाव, अंतरवेली, धानोरे या १४ गावांचा समावेश आहे.
मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या गणात आदिवासी, मातंग या जमातीदेखील कमी-अधिक प्रमाणात समाविष्ट आहेत. चिचोंडी परिसरात औद्योगिक वसाहत मंजूर झाली असून, याबाबतचा कृती आरखड्याला शासनाची मंजुरी मिळाली असली तरी निधीअभावी हे काम रखडले आहे. चिचोंडी परिसरात औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास चिचोंडीसह मुखेड गटातील तसेच संपूर्ण तालुक्यातील युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागला तर संपूर्ण तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रवादीच्या शिवांगी पवार यांच्या सभापतिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक पाच कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या ९१ अंगणवाडीच्या इमारती उभ्या
राहिल्या आहेत. उघड्यावर शिक्षण घेणाऱ्या तालुक्यातील विविध अंगणवाडीची बालके या इमारतीमधून शिक्षण घेत आहेत. चिचोंडी खुर्द व बुद्रुक या तहानलेल्या गावांना ३८ गावे पाणीपुरवठा योजनेंतर्गत जोडण्याचे महत्त्वकाक्षी कामेही पवार यांनी हातावेगळी करून या गावांची तहान भागविली आहे. गणातील प्रत्येक गावात स्मशानभूमी व परिसरातील कॉँक्रीटीकरण झाल्याचा दावा पवार यांनी केला आहे.
शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत गणासह तालुक्यातील विविध गावांतील ग्रामपंचायत इमारतीची कामे
पूर्णत्वास गेली आहे. महामार्गावर येणाऱ्या एरंडगाव खुर्द
गावातील रस्त्यालगत असलेल्या बालवाडीच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे.