नाशिक महापालिकेतील मुख्य लेखाधिकाऱ्याची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:56 PM2018-05-18T18:56:08+5:302018-05-18T18:56:08+5:30

विनंतीनुसार बदली : मुख्य लेखाधिकारीपदी नवी मुंबईतील सुहास शिंदे

 Chief Administrative Officer of Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील मुख्य लेखाधिकाऱ्याची बदली

नाशिक महापालिकेतील मुख्य लेखाधिकाऱ्याची बदली

Next
ठळक मुद्देकर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचा धडाका लावल्याने अधिकारी व कर्मचारीवर्ग धास्तावला सुहास शिंदे मागील पाच वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत कार्यरत

नाशिक : महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचा धडाका लावल्याने अधिकारी व कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. स्थानिकसह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांमध्येही अस्वस्थता पसरल्याने महापालिकेत विनंती बदल्यांचे वारे घोंघावत आहे. त्यातूनच मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी केलेली विनंती बदली शासनाने मान्य करत त्यांच्या जागेवर नवी मुंबई महापालिकेतील मुख्य लेखा परीक्षक सुहास विष्णु शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय शिस्त लावताना अनेक कठोर निर्णय घेत कर्तव्यात कसूर करणा-यांना घरचा रस्ता दाखविला आहे. एखादी छोटीशी चूकही निलंबनाच्या कारवाईला भाग पाडू शकते, या भीतीने सध्या महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गाला घेरले आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय शिस्त निर्माण होत असली तरी, बाजू न मांडण्याची संधी देता होत असलेल्या धडक कारवाईमुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे १४ अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर अनेकांच्या वेतनवाढ बंद करण्याची कारवाई झालेली आहे. कारवाईचा बडगा स्थानिकसह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांवरही पडू लागल्याने त्यांच्यातही अस्वस्थता आहे. त्यातूनच काही अधिकारी विनंती बदल्यांसाठी प्रयत्नरत आहेत. मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी एप्रिल महिन्यात कौटुंबिक कारणास्तव विनंती बदलीचा अर्ज दिला होता. भोर यांचा दोन वर्षांचाही कार्यकाल अद्याप पूर्ण झालेला नाही. परंतु, त्यांनी केलेली विनंती बदली शासनाने मान्य केली असून, त्यांच्या जागेवर नवी मुंबई महापालिकेतील मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोर यांच्या पदस्थापनेचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. सुहास शिंदे मागील पाच वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत कार्यरत होते. त्यांनी लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक व उपआयुक्त प्रशासन अशी पदे भूषविली आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही नवी मुंबई महापालिकेत विरोधात वातावरण तयार झाले होते. नवी मुंबई महापालिकेत तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी काम केले असल्याने आता नाशिक महापालिकेत मुंढे यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी त्यांना चालून आली आहे.

Web Title:  Chief Administrative Officer of Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.