मुख्याधिकारीविना कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प
By admin | Published: May 15, 2016 10:24 PM2016-05-15T22:24:34+5:302016-05-15T22:32:19+5:30
मागणी : अशोक चव्हाण यांना लक्ष घालण्यासाठी साकडे
कळवण : नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे .
जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये अशीच परिस्थिती असल्याने याप्रश्नी कळवण येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आदिवासी वनहक्क परिषदेला आलेल्या माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कळवण नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पगार, काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रोहिणी महाले यांनी केली आहे.
याप्रश्नी राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारींसह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा नियुक्ती करण्याबाबत राज सरकारनचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली.
नगरपंचायतीला ग्रामपंचायती पेक्षा जादा विकास निधी येत असल्याने जनतेत ही आशा निर्माण झाली होती. परंतु नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. त्याला आता सात महिने झाले. मात्र नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.
नागरिक नगरपंचायतीत चकरा मारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांना भेटतात. मात्र कागदपत्रे व दाखले कशी द्यायचे, याबाबत देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा उलगडा पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना होत नसल्याने हतबल झाले आहे. कळवण शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. कळवण नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आणि संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहे.
कळवण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. पण, यंत्रणा नसल्याने पदाधिकारी व नगरसेवक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)