नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बदलीने अन्य अधिका-यांना चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:16 PM2018-02-06T14:16:34+5:302018-02-06T14:18:26+5:30
जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खासदारांनाही त्याच
नाशिक : मनमानीपणे शासकीय कामकाज करून पदाचा दुरूपयोग करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींचा अपमर्द व सह अधिका-यांच्या अपमानात धन्यता मानणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने जिल्ह्यातील कामचुकार अधिका-यांना मोठा धडाच मिळाला असून, मीना प्रकरणात लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजुटच कामी आल्याने नजिकच्या काळात सनदी अधिका-यांकडून लोकप्रतिनिधींना मानसन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा त्यानिमित्ताने बळावली आहे.
जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खासदारांनाही त्याच तराजूत तोलण्यास सुरूवात केल्याने त्यातून आमदार अनिल कदम यांच्याशी त्यांची हुज्जतही झाली होती. लोकप्रतिनिधींना कस्पटासमान संबोधणा-या मीना यांनी आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचा-यांनाही तुच्छतेची वागणूक देण्यास सुरूवात केल्यामुळे त्याचा परिणाम संपुर्ण जिल्हा परिषदेच्या व पर्यायाने ग्रामीण विकासाच्या कामावर झाला. गेल्या सहा महिन्यांपासून मीना यांचा वारू बेफाम उधळत असताना तत्कालीन विभागीय आयुक्तांनीही त्यांच्या या कृत्याकडे दुर्लक्षाची भुमिका घेतली मात्र महेश झगडे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर मात्र मीना यांच्या कार्यक्षमतेची ख-या अर्थाने कसोटी लागली. कुपोषणासारख्याअतिशय संवेदनशील असलेल्या विषयाप्रती मीना यांची असलेली उदासिनता, ग्रामपंचायतींची व आदिवासी विकास विभागाच्या कामांचा झालेला खेळखंडोबा झगडे यांनी गांभीर्याने घेत अगोदर मीना यांना कार्यपद्धती दुरूस्त करण्याची पुरेपूर संधी दिली परंतु मीना यांनी त्याचेही राजकारण करीत आपला कामचुकारपणा झाकण्याचा प्रयत्न केला.
मीना यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक व अधिका-यांनीही असहकाराचे अस्त्र उपसले तर लोकप्रतिनिधींनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागल्याने मीना यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. जिल्ह्यात अशा प्रकारे आरएएस अधिका-याची बदली होण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे मीना यांच्यासारख्या आयएएस अधिका-यांना चांगलाच धडा या निमित्ताने मिळाला