मुख्यमंत्री उदासीन : पालकमंत्री सुस्त
By admin | Published: May 17, 2015 11:52 PM2015-05-17T23:52:13+5:302015-05-17T23:52:34+5:30
‘मांजरपाडा’पुढे अडचणींचा डोंगर
येवला : दुष्काळी येवला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या मांजरपाडा-१ प्रकल्पाच्या सुधारीत ४५४ कोटींच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता न दिल्याने व मागील शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यते अभावी अखर्चित राहिल्याने आणि २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळवल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे काम ठप्प झाले असल्याचे वृत्त आहे.
या प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे.
सुरगाणा तालुक्यातील केम पर्वत रांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. मात्र त्याच वेळी कागदावरही अस्तित्वात नसलेल्या मांजरपाडा-२ साठी मात्र सर्व निधी देऊ, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस विधानसभेत सांगत आहेत. जलसंपदामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा-१ वळण योजनेबद्दल सोयिस्कर मौन बाळगले आहे. या योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ४५४ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच मागच्या सरकारने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यातील २८ कोटींचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पांसाठी वळविला आहे. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आमदार भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटीतून हा प्रश्न मांडला असून, विधी मंडळातही अनेक वेळा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. असे असूनही शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ केली आहे. शासनाच्या दप्तर दिरंगाई मुळे योजनेचा खर्च अजुन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)