"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका
By संजय पाठक | Published: September 16, 2023 04:25 PM2023-09-16T16:25:55+5:302023-09-16T16:27:15+5:30
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नाशिक- राज्यात पावसाअभावी शेतीची अवस्था बिकट आहे. मुख्यमंत्री शेतात दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात, विमान वापरण्याच्या नियमात बदल करून घरच्या कामासाठी शासकीय विमान वापरतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते, असा प्रश्न शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये त्यांचे शनिवारी (दि.१६) आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बेालतांना त्यांनी दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला.
राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झाले, मात्र काहीच प्रगती दिसत नाही, मंत्री पद आणि पालकमंत्रीपदासाठी सारे भांडत आहे. स्वत: ५० खोक्यांचे पॅकेज घेणारे शेतकऱ्यांच्या पॅकेजतची कार्यवाही करीत नाहीत, गेल्या वर्षी चार हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषीत करण्यात आले, त्यापैकी एक रूपया देखील दिलेला नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या वर्षी ओला दुष्काळ तर यंदा कोरड्या दुष्काळाची स्थिती आह. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळत नसून कर्ज वसुलीसाठी देखील नोटीसा बजावल्या जात आहेत, सरकार मुळातच घटनाबाह्य असून ते संवेदनशीलही नाही अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.