हेमंत गोडसे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये
By संजय पाठक | Published: May 1, 2024 04:36 PM2024-05-01T16:36:00+5:302024-05-01T16:37:46+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी अखेर नाशिक मधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिक- लोकसभा निवडणुकीसाठी अखेर नाशिक मधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांना उमेदवारी मिळताच त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तर दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी भुजबळ फार्मवर दाखल झाले.
दरम्यान, उद्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे शक्तिप्रदर्शन द्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेच या मिरवणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे सेना भाजप आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता त्यामुळे उमेदवारी विलंब होत होता. मात्र, आज दुपारी हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे त्यांनी आता ,अन्य पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून गोडसे तातडीने भाजपा कार्यालयात रवाना झाले तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली.