मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात
By admin | Published: September 8, 2016 01:50 AM2016-09-08T01:50:38+5:302016-09-08T01:51:29+5:30
मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात
नाशिक : जलयुक्त शिवार, विहीर पुनर्भरण यासारख्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा विभागीय पातळीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशकात दाखल होत असून, त्यांच्यासमवेत जलसंधारण मंत्री राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे सकाळी ११ वाजता नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार व धुळे या पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलविली असून, त्यात तालुका व योजना निहाय आढावा घेण्यात येणार आहे. फडणवीस यांचे सकाळी दहा वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल व तेथून ते थेट आरोग्य विज्ञान विद्यापीठात दाखल होतील. दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत विभागीय आयुक्त एकनाथ डवले तसेच जलसंधारण, कृषी, सामाजिक न्याय, पाणीपुरवठा, ग्रामविकास, महसूल या खात्याचे सचिव आपापल्या खात्याचे सादरीकरण करतील, त्यानंतर मुख्यमंत्री स्वत: कामाच्या प्रगती आढावा, त्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महसूल खात्याची धावपळ उडाली असून, दिवसभर अधिकारी वर्ग या बैठकीच्या तयारीत व्यस्त होते. राज्यात अशा प्रकारे पहिलीच बैठक नाशिकमध्ये होत असल्यामुळे आयोजक अधिकाऱ्यांमध्ये या बैठकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.