महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Published: May 26, 2017 12:20 AM2017-05-26T00:20:39+5:302017-05-26T00:20:51+5:30

नाशिक : नाशिक शहराचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (दि.२८) नाशिक दौऱ्यावर येत आहे.

Chief Minister of the municipal corporation | महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

महापालिकेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक शहराचे पालकत्व स्वीकारणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या रविवारी (दि.२८) नाशिक दौऱ्यावर येत असून, यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत महापालिका मुख्यालयात होणाऱ्या बैठकीत विविध प्रकल्पांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रथमच महापालिका मुख्यालयात बैठकीसाठी येणार असल्याने आयुक्तांनी शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. नाशिक महापालिकेची आर्थिक प्रकृती गेल्या पाच ते सात वर्षांपासून पुरती बिघडलेली आहे. जकात रद्द झाल्यानंतर एलबीटी लागू झाला, परंतु नंतर ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटीही रद्द होऊन महापालिकेला शासन अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही दरवर्षी ८ टक्के वाढ धरून अनुदान दिले जात असल्याने महापालिकेला आर्थिक गाडा हाकणे दुरापास्त बनले आहे. आता जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होत असली त्याच्या अनुदानाबाबतही स्पष्टता नसल्याने स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांसाठी अर्थभार उपलब्ध करून देण्याविषयी साशंकता आहे.
महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले असले तरी यंदा केवळ १५८ कोटी रुपयेच भांडवली कामांसाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे प्रशासनापुढे आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत येत्या रविवारी (दि.२८) मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत असल्याने महापालिकेमार्फत त्यांना निधीसाठी साकडे घातले जाणार आहे.
त्यात प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांकडे विविध रस्ते तसेच आरक्षित जागांच्या भूसंपादनाकरिता सुमारे ८०० कोटी रुपये, किकवी धरणासाठी ५०० कोटी रुपये तसेच पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनसह विविध प्रकल्पांसाठी असे एकूण सुमारे दोन हजार कोटी रुपये निधीसाठी साकडे घातले जाणार आहे. नाशिकचे पालकत्व घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आता महापालिकेच्या पदरात किती दान पडते, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.

Web Title: Chief Minister of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.