आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास मुख्यमंत्री जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:47 PM2018-08-01T14:47:28+5:302018-08-01T14:54:44+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या असून, मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलनातील सहभागी एकही कार्यकर्ता हातात दगड, विटा घेणार नाही अशी शपथ घेतांनाच जर पोलीस बळाचा वापर करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निश्चित करण्याचे ठराव करण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री नाशिक तालुकास्तरीय बैठक पश्चिम पट्टयातील गिरणारे येथील गायत्री लॉन्स येथे घेण्यात आली. याबैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, शिवाजी चुंभळे, राजू देसले, गणेश कदम, आशिष हिरे यांनी चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता ठरवून दिली. त्यात प्रामुख्याने ‘जो हातात दगड घेईल तो मराठा नाही’ असे समन्वयकांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी मार्गादर्शन करताना शिवाजी चुंबळे यांनी, इतरांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य आंदोलनाच्या ठिकाणी कोणीही करू नये, तसेच चुकीच्या घोषणा देऊन इतर समाज दुखवणार याची काळजी घ्यावी, हिंसाचार करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, आत्तापर्यंत समाजाने शांततेच्या आणि संयमाचा भूमिकेत आंदोलन यशस्वी केल्याने येणाऱ्या काळात आणखी जोमाने आणि यशस्वी आंदोलन करण्यासाठी जिल्हा समन्वयकांनी घातलेली आचारसहिता पाळावी असे आवाहन केले.
सर्व पक्षीय झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी चक्काजाम आंदोलनात घरातील मुलं, महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असे जाहीर केले. तसेच ग्रामपंचायतीचा ठराव करून ९ आॅगस्टला शांततेत केल्या जाणाºया आंदोलनाला गालबोट लावले किंवा बळाचा वापर करून हिंसाचार निर्माण केला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निश्चित करून त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करावे असा ठराव करून मुख्यमंत्री कार्यलयात पाठवण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
बैठकीस दिलिप शंकरराव थेटे, युवराज कोठुळे, तानाजी गायकर, शशीआप्पा थेटे, विकी दिलीपराव थेटे, हरीभाऊ गायकर, संजय संतु थेटे, राहुल दौलतराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब लांबे, विलास सांडखोरे,आनिल थेटे, राम खुर्दळ यांच्यासह गिरणारे, दुगाव, वाडगाव, साडगाव, धोंडेगाव, मनोली, दरी, मातोरी, महादेवपुर, मुंगसरा, चांदशी, जलालपुर आदी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिीत होते.