मुख्यमंत्र्यांकडून चौकशी समिती स्थापन

By admin | Published: February 5, 2015 12:25 AM2015-02-05T00:25:21+5:302015-02-05T00:25:35+5:30

ओझर पार्टी : उत्पादन शुल्कनेही केला गुन्हा दाखल

Chief Minister set up inquiry committee | मुख्यमंत्र्यांकडून चौकशी समिती स्थापन

मुख्यमंत्र्यांकडून चौकशी समिती स्थापन

Next

नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावर झालेल्या साग्रसंगीत पार्टीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, या पार्टीत सहभागी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी पथकाची स्थापना केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता भरारी पथक मंडळाचे अधिकारी एम. एन. डेकाटे यांनी नाशिकला जाऊन तीन दिवसांत या प्रकरणाची सखोेल चौकशी करून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्याकडे सोपवावा, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेंद्र आवळे यांनी या घटनेत मद्य परवाना परवानगीच्या अर्टी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी हर्ष कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा १९४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
काल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेऊन या गंभीर प्रकरणाची माहिती देत कारवाईची मागणी केली, तसेच जिल्हाधिकारी विलास पाटील हेही काल मुंबईतच होते. त्यांनीही या घटनेचा अहवाल सादर केल्याचे समजते.
३१ जानेवारीला विलास बिरारी यांनी हर्ष कन्स्ट्रक्शनच्या नावाने एक दिवसाचा मद्य परवाना घेतला होता. प्रत्यक्षात त्या दिवशी ओझरच्या नाशिक विमानतळावर सहभागी अधिकारी व मक्तेदारांकडेच दारू पिण्याचा परवाना
नसल्याची बाब उत्पादन शुल्क विभागाने उपस्थित केली आहे. (प्रतिनिधी)


राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य परवाना घेतल्यानंतर अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी विलास बिरारी यांच्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काचे प्रभारी निरीक्षक एस. एस. देशमुख तपास करीत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक राजेंद्र आवळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीच आता चौकशी समितीची स्थापना केल्याने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
इन्फो...
पोलिसांची भूमिका बघ्याची?
मुख्यमंत्र्यांनी ओझर विमानतळावरील साग्रसंगीत पार्टीची गंभीर दखल घेतली असली तरी, ज्यांनी गुन्हा दाखल केला त्या पोलीस यंत्रणेकडून या गंभीर प्रकरणात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची व त्यातील आरोपींपैकी केवळ आॅर्केस्ट्राचे संचालक सुनील ढगे यांना अटक करण्यापुरतीच भूमिका राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Chief Minister set up inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.