CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:55 PM2024-01-01T16:55:49+5:302024-01-01T17:18:35+5:30

सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही

Chief Minister Shinde and Fadnavis gave understanding to chhagan Bhujbal and...; Damania thanked the three | CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

CM शिंदे अन् फडणवीसांनी भुजबळांना समज दिली अन्...; दमानियांनी मानले तिघांचे आभार

राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी आमने सामने आले आहेत. त्याच अनुषंगाने ओबीसींच्या हक्कासाठी म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात एल्गार सभा होत आहेत. याच सभांमधून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना छगन भुजबळ यांनी मी कष्टाने कमावलेलं खातं असं म्हटलं. त्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत, एका फर्नांडिस कुटुंबीयांना भुजबळांनी कसे फसवले हे माध्यमासमोर येऊन सांगितले. 

सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून फर्नांडिस कुटुंब त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतंय, परंतु भुजबळांकडून कुठलीही दाद मिळत नाही. या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ४८ तासांत कुटुंबाला पैसे न मिळाल्यास भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता. आता, या फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचं दमानिया यांनी सांगितलं. त्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. 

गेले काही वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. सांगण्यास आनंद आहे की भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल २० वर्षाने दिले. त्या कुटुंबाला आता त्यांचे पूर्ण पैसे मिळाले, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच, ७८ वर्षाच्या त्या आईला आता तिच्या ३ ऑटिस्टिक मुलांच्या भविष्याची काळजी करावी लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले.  

पवार कुटुंबाबरोबर माझी टोकाची भूमिका असतांना देखील ह्या लढ्यात राजकारण बाजूला ठेऊन सुप्रिया सुळे यांनी खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, असेही दमानिया यांनी म्हटले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसे देण्यास भाग पाडले, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. भुजबळांकडून २० वर्षानंतर फर्नाडिस कुटुंबाला न्याय मिळाला. भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे दिले. पण या लढ्यातून खूप समाधान मिळाल, असेही त्यांनी म्हटले. 

काय आहे प्रकरण

अंजली दमानिया म्हणाल्या की, गेल्या दीड वर्षापासून आम्ही फर्नांडिस कुटुंबासाठी लढतोय, आम्ही एफआयआर केली. छगन भुजबळांचे मी प्रक्षोभक भाषण ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली. तुमचं खातो का, मी माझ्या कष्टाचे खातो असं विधान त्यांनी केले. काल जे भुजबळ बघितले त्यांच्यात इतका जोर कुठून आला? नेमकं कुठल्या कष्टाचे खातायेत ते दाखवण्यासाठी आज मी भुजबळांचे घर मीडियाला दाखवणार होते. जे त्यांचे घर नसून हे फर्नांडिस कुटुंबाचे लुटलेले घर आहे. १९९४ मध्ये फर्नांडिस कुटुंब त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला असं त्यांनी सांगितले. 

या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. तो जो बंगल्याचा प्लॉट होता तो समीर भुजबळांच्या परवेज कन्ट्रक्शनला परस्पर विकला गेला. ज्यादिवशी बंगला बुलडोझरनं पाडला त्यानंतर कुटुंब समीर भुजबळांना एकदा नव्हे हजारवेळा भेटले. तरीही आजतागायत या कुटुंबाला १ रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही. सांताक्रुझ पश्चिमेला ती जी टोलेजंग इमारत आहे. जे ते कष्टाचे असल्याचे बोलतात, हा लुटलेला होता. फर्नांडिस कुटुंबाचा बंगला पाडून मोठी इमारत बांधलीय. त्या ९ व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलंय. जिथे भुजबळ कुटुंब पोहते. हे या कुटुंबाचे पैसे आहेत. आजतागायत कुटुंबाला पैसे मिळाले नाहीत असा आरोप दमानिया यांनी केला. 

त्याचसोबत मी सुप्रिया सुळेंना हे पाठवले, ३० सेकंदात त्यांचा फोन आला. माणूस पाठवून या कुटुंबाची पडताळणी केली. अक्षरश: या कुटुंबाची दयनीय परिस्थिती आहे. ७८ वर्षाची बाई ३ दिव्यांग मुलांना एकटं सांभाळते. ती उद्या गेली तर उद्या या मुलांना कुठे ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. दीड वर्ष झाले तरी समीर भुजबळ टोलवाटोलवी करत होते. जानेवारी महिन्यात साडे ८ कोटी देतो म्हणून सांगितले परंतु त्यानंतर भाजपात जाणार असल्याचे कळाल्यानंतर हे पैसे थांबवले. तुमच्याकडे इतका पैसा आहे पण या कुटुंबाला न्याय हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. 

छगन भुजबळांनी फेटाळले होते आरोप

अंजली दमानिया यांच्या आरोपावर छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कुणाचेही घर लाटले नाही. याबाबत कोर्टात केस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. परंतु हे नाटक त्यांना आजच का करायचे सुचले. जेव्हा ओबीसींची मोठी लढाई सुरू झाली तेव्हा हे पुढे आले. ही सगळी नाटके मला माहिती आहे. त्यांना त्यांचे नाटक लखलाभ होवो अंजली दमानिया ताई आहेत, मी अधिक बोलणार नाही. हे सुपारी घेऊन बोलणारे यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही असं म्हणत भुजबळांनी आरोप फेटाळले होते. मात्र, आता त्यांनी पैसे दिले आहेत.  
 

Web Title: Chief Minister Shinde and Fadnavis gave understanding to chhagan Bhujbal and...; Damania thanked the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.