मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच
By admin | Published: October 10, 2014 11:52 PM2014-10-10T23:52:34+5:302014-10-11T00:03:18+5:30
मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच
मनमाड : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीवाल्यांनी सांगण्याची गरज नाही. ते जनताच ठरवणार असून, होणारा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, अशी गर्जना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनमाड येथे केले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, कारभारी अहेर, माजी आमदार संजय पवार, राजाभाऊ देशमुख, अलताफ खान, दादा भुसे, नितीन अहेर, सुहास कांदे, एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे उपस्थित होते.सभेची सुरवातच ठाकरे यांनी मनमाडच्या पाण्याने केली. शहराचा पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नसताना निवडणुकीत मते मिळवण्यासाठी शहराचा पाणीप्रश्न सोडवल्याचे सांगणाऱ्यांच्या खोटारडेपणाला जनता भुलणार नाही. शिवसेनेकडे सत्ता नसतानाही टंचाई काळात शिवसेनेने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. भुजबळांवर तोफ डागताना ते म्हणाले की, तेलगी घोटाळा, चिखलीकर घोटाळा आम्ही विसरून गेलो काय अन््् आज ते तुमच्यासमोर येताय साधूसंत असल्याप्रमाणे. आपल्या भाषणात त्यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच भाजपलाही टीकेचे लक्ष बनवले. भाजपासोबतची युती आपण तोडली नाही. संकटाच्या वेळी त्यांना शिवसेनेची गरज भासली. महाराष्ट्र गिळण्यासाठी नव्हे, तर घडवण्यासाठी पाहिजे आहे. भाजपाला पराभव दिसू लागल्याने देशातील वेगवेगळ्या राज्यातील मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी येत असल्याची टीका ठाकरे त्यांनी केली. मतदारांच्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणारच असा विश्वास ठाकरे शेवटी यांनी व्यक्त केला. एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे यांच्या संघटनेने शिवसेनाला पाठिंबा दिला असल्याने ताकद वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(वार्ताहर)