मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; नाशिकमध्ये गोदाकाठी भाजप अध्यात्मिक आघाडीचा शंखनाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 10:29 AM2021-08-30T10:29:06+5:302021-08-30T10:30:08+5:30
Nashik News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आता सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही मंदिर आणि धार्मिक स्थळे बंद आहेत.
नाशिक - शहरातील बहुतांश निर्बंध शिथिल होऊन सुद्धा केवळ मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे बंद ठेवल्याने भाजपाने पुन्हा आज जोरदार आंदोलन सुरू केले आहे. भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे नेतृत्वाखाली आज गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महतांच्या उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव होईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आता सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही मंदिर आणि धार्मिक स्थळे बंद आहेत.
त्यामुळे धार्मिक स्थळांशी संबंधित लाखो नागरिकांची आर्थिक अडचण त्यामुळे होत आहे तसेच मंदिरे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने मंदिरे आरोग्य नियमांचे पालन करून सर्व व्यवस्थित खुली होऊ शकतात असे वारंवार सांगूनही मंदिर उघडली जात नसल्याने भाजपाच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज गोदाकाठी शंखध्वनी तसेच ढोल-ताशांच्या गजरात आंदोलन करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ धार्मिक स्थळे बंद ठेवणं ही कृती अत्यंत धर्मविरोधी असून यापुढे मंदिर खुली केली नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मयुद्धासाठी तयार व्हावे, राज्यभर आता मागणी नाही आणि विनंती नाही तर धर्म युद्ध आणि तांडव करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल तसेच अन्य संत महंत यावेळी उपस्थित होते.