मुख्यमंत्र्याचे दत्तक विधान नाशिककरांना पडणार महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:58 PM2018-02-20T18:58:17+5:302018-02-20T18:59:25+5:30
भाजपाने ३३ टक्के करवाढीचा टाकला बोजा: विरोधकांचा बहिष्कार
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक विधान करून जबाबदारी स्वीकारलेल्या नाशिकमध्ये भाजपाने मंगळवारी ३३ टक्के करवाढ नाशिककरांवर लादून मोठा दणका दिला. या दणक्यामुळे शिवसेनेबरोबरच कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने सभागृहात गोंधळ घातला. परंतु सत्तारूढ भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांनी निर्णय कायम ठेवल्याने अखेरीस विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आणि बाहेर येऊन भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी नाशिककरांना दत्तक घेतल्याची साद घातली होती. परंतु दत्तक विधान इतके महागात पडेल अशी कोणाला खात्री नव्हती, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत घरगुती घरपट्टीत ३३ टक्के दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून, अनिवासी ६४ औद्योगिक ८२ टक्के अशी भली मोठी वाढ करण्यात आली आहे. महापालिकेचे नूतन आयुक्त तुकाराम मुंढे स्वत:च या दरवाढीसाठी आग्रही होते आणि त्यांनी महापौरांना रुलिंगही लिहून दिले. या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी बहिष्कार घातला तसेच महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.