मुख्यमंत्र्यांच्या तोतया सहायकाचा जिल्हा बँकेच्या प्रशासकांना फोन; सक्तीच्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्याला कामावर हजर करून घेण्याची सूचना
By संकेत शुक्ला | Published: December 29, 2023 06:42 PM2023-12-29T18:42:54+5:302023-12-29T18:43:12+5:30
या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नाशिक: मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुमच्या बँकेत कार्यरत असलेले आणि सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्याला कामावर हजर करून घ्या असा निरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवर देणाऱ्या भामट्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. २८ व २९ नोव्हेंबरदरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासकीय अधिकारी प्रतापसिंग चव्हाण (६७) यांना अज्ञात इसमाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए कानडे बोलत असल्याचे सांगितले. त्याने चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर असलेले व चौकशी सुरू असलेले बँकेचे अधिकारी शैलेश पिंगळे यांना एन. डी. सी. सी. बँकेत पुन्हा रुजू करून घेण्याची सूचना केली. ही सुचना करताना या भामट्याने संबंधित व्यक्तीला त्वरीत रुजू करून घ्या असा दबाव टाकला.
चव्हाण यांना या फोनबद्दल शंका आली. त्यांनी प्रथम स्थानिक स्तरावर चौकशी केल्यानंतर तोतयेगिरीची शंका आल्याने त्यांनी फोन करणाऱ्या अज्ञात इसमा विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत. आमच्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात याबाबत फोन करून माहिती घेतली. मात्र त्यांच्या कार्यालयात कानडे नावाचा कोणताही अधिकारी पीए म्हणून कार्यरत नसल्याचे समजले. त्यानंतर आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. - अभिजीत सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक