मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाचा केक कापून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:05 AM2018-05-31T00:05:06+5:302018-05-31T00:05:06+5:30
महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही.
नाशिक : महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही. याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने नाशिकरोड महापालिका कार्यालयाबाहेर केक कापण्यात आला. नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे २०१७ रोजी महापालिकेत देखाव्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीत दत्तक नाशिककरिता अनेक मोठे प्रकल्प येतील तसेच नाशिककरिता भरघोस निधी मंजूर होईल याकरिता नाशिककरांचे डोळे या बैठकीकडे लागले. परंतु एक वर्ष पूर्ण होत झाले असताना आजतागायत रोजगार निर्मितीसाठी एकही मोठा प्रकल्प नाशिकमध्ये आला नाही. याची जाणीव करून देण्यासाठी केक कापण्यात आल्याचे राष्ट्रवादी माथाडी कामगारचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी सांगितले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मुकेश शेवाळे, राष्ट्रवादी माथाडी शहराध्यक्ष गणेश पवार, गणेश गांगुर्डे, प्रवीण साळुंखे, तुषार दोंदे, अक्षय विभुते, आकाश अहिरे, योगेश बीडगर, रविराज कांगने, तुषार अहिरे, नीलेश कोथमिरे, आकाश खैरनार, सचिन गायकवाड, उत्तम पगारे आदी उपस्थित होते.
‘फसवनीस सरकार हाय हाय’, ‘दत्तक नाशिकला सावत्रपणाची वागणूक देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपाला मत द्या, मी नाशिक दत्तक घेतो’ अशी घोषणा केली होती.