मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : विश्वस्त मंडळ व जीर्णोद्धार समितीचा निर्णय निवृत्तिनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:47 PM2017-12-17T23:47:24+5:302017-12-18T00:18:37+5:30
वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने करून भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक : : वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या त्र्यंबकेश्वर येथील संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळाने करून भव्य मंदिर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन येत्या २६ डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती वारकरी आढावा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली.
संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्त मंडळ व मंदिर जीर्णोद्धार समितीची संयुक्त बैठक ढिकलेनगर येथील श्रीराम वारकरी मंडळ भवनात जीर्णोद्धार समितीचे प्रमुख डॉ. रामकृष्ण लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मंदिर जीर्णोद्धार तसेच कार्यक्र माचे नियोजन करून जास्तीत जास्त संख्येने भाविक कसे उपस्थित राहतील, याबाबत चर्चा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांचे संजीवन समाधी स्थळ असून, मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. या जीर्णोद्धार सोहळ्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री उदयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे आदींसह खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे, विश्वस्त त्र्यंबक गायकवाड, पुंडलिक थेटे, ललिता शिंदे, जिजा लांडगे, धनश्री हरदास, पंडित कोल्हे, माधवदास राठी, अविनाश गोसावी, योगेश गोसावी, जयंत गोसावी, रामभाऊ मुळाणे, आदींसह विश्वस्त मंडळ व जीर्णोद्धार समिती सदस्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ वारकरी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक धोंडगे यांनी केले.