मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नाभिक समाजातर्फे निषेध ; तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:09 AM2017-11-18T00:09:17+5:302017-11-18T00:13:06+5:30
नाभिक समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली.
नाशिक : नाभिक समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली. मुख्यमंत्र्यांनी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी नाभिक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याविरुद्ध नाभिक समाजात तीव्र संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजाकडून होत असून, या वक्तव्याच्या विरोधात नाशिकच्या सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्वांनी हाताच्या दंडाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतानाच त्यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाभिक समाजाविषयी जे काही मत मांडले आहे, तशी घटना कोणत्याही सलूनमध्ये घडलेली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी तसे सिद्ध केल्यास समस्त नाभिक समाजाकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल, असे आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात दिलीप तुपे, नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, दिलीप जाधव, अरुण सैंदाणे, नारायण वाघ, सुभाष बिडवई, संजय वाघ, तुषार बिडवे, विलास भदाणे, सुरेश बोरसे, अशोक सोनवणे आदी समाजबांधव सहभागी झाले होते.
शांतताप्रिय समाज
नाभिक समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, विश्वासू समाज म्हणून ओळखला जातो. उदरनिर्वाहासाठी हजामतीचा व्यवसाय करतो. नेहमी हत्यार जवळ असतानाही त्याने कुणाशीही द्वेषभावनेने हत्याराचा दुरुपयोग केलेला नाही. अशा इमानदार समाजाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले व समाजाचा अवमान केला असून, त्यांनी तत्काळ समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.