कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी भुजबळांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
By admin | Published: December 12, 2014 01:21 AM2014-12-12T01:21:47+5:302014-12-12T01:22:24+5:30
कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी भुजबळांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
नाशिक : आगामी कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिखर समितीच्या बैठकीत २३७८.७८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अधिवेशनात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. मंजुरी आराखड्यानुसार आराखड्यातील समाविष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून आत्तापर्यंत एकूण ८८८.२१ कोटी व केंद्र शासनाच्या संबंधित विभागाच्या कामासाठी त्या-त्या संबंधित विभागाकडून एकूण ३४.७६ कोटी तसेच नाशिक नगरपालिकेकडून ७१.०७ असे एकूण ९८९.०४ कोटी इतका निधी उपलब्ध झालेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर कुंभमेळा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. कुंभमेळ्याशी संबंधित सर्व प्रकारच्या कामाचे नियोजन व अंमलबजावणीच्यादृष्टीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन असून, समितीची नुकतीच बैठकही झाली. भुजबळ यांनी तारांकित प्रश्नात म्हटले आहे की, आगामी कुंभमेळ्यासाठी राज्यशासनाने मंजूर केलेल्या २३७८.७८ कोटी रुपयांच्या आराखड्यानुसार शासनाने उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. कुंभमेळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी साधनसामुग्री व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्या जात आहे काय? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले होते.