बनावट नोटा प्रकरणी मुख्य संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 10:41 PM2021-09-13T22:41:19+5:302021-09-13T22:41:54+5:30
सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चारजणांना अटक करण्यात आली असून, यात आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयितांकडून छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुरगाणा : बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह चारजणांना अटक करण्यात आली असून, यात आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. दरम्यान, संशयितांकडून छपाई केलेल्या ५०० आणि १०० च्या बनावट नोटा, एक स्कोडा कार व साहित्य असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्याच्या सीमावर्ती भागात बनावट शंभरची नोट देऊन फक्त १० ते २० रुपयांची खरेदी करून या बनावट नोटा व्यवहारात आणत असल्याचे काही दिवसांपूर्वी उंबरठाण येथे उघडकीस आले होते. त्यावेळी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या येवल्यातील हरीष गुजर व बाबासाहेब सैद या दोघांना सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आणखी नावे समोर आल्याने अक्षय राजपूत यास येवल्यातून ताब्यात घेण्यात आले. सध्या हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर यात सहभागी असलेला व २० वर्षांपासून प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करणारा मुख्य संशयित आरोपी किरण बाळकृष्ण गिरमे (४५, रा. विंचूर) याच्यासह प्रकाश रमेश पिंपळे (३१) रा. येवला, राहुल चिंतामण बडोदे (२७) रा. चांदवड, आनंदा दौलत कुंभार्डे (३५) रा. चांदवड यांना अटक करून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेले साहित्य प्रिंटर, कॉम्प्युटर, आदी साहित्यांसह १०० रुपयांचे पाठपोट छपाई केलेले १७७ कागद व ५०० रुपयांचे छपाई केलेले २६५ कागद, आदी मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून या बनावट नोटा प्रकरणी यशस्वी तपास करून सातजणांना अटक केली आहे. यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पोलीस नाईक पराग गोतुरणे, पोलीस शिपाई संतोष गवळी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एसआय रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार हनुमंत महाले, वसंत खांडवी, आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले.
इन्फो
एका कागदावर चार नोटा प्रिंट
एका कागदावर चार बनावट नोटा प्रिंट केल्या आहेत. शंभराच्या ८८ हजार २००, तर ५०० च्या पाच लाख तीस हजार बनावट नोटा आहेत. स्कोडा कारसह ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ९ लाख ७८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांना सोमवारी (दि. १३) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता यातील प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून, मुख्य संशयित किरण गिरमे व आनंदा कुंभार्डे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांपैकी सर्वप्रथम दोघांना अटक केली होती. आता यामध्ये सातजणांना अटक झाली आहे. मुख्य आरोपी विंचूर येथील असून, पुढील तपास चालू आहे.
- संदीप कोळी, पोलीस निरीक्षक.