चिखलीकर लाच प्रकरणातील सुनावणी पुर्ण; निकालाकडे राज्याचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 09:11 PM2019-08-25T21:11:09+5:302019-08-25T21:38:51+5:30
चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता लाचखोर सतीश चिखलीकर व शाखा अभियंता जगदीश वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना २०१३साली सापळा रचून अटक केली होती. यानंतर राज्यभरात चिखलीकरच्या नावे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आल्याने हा खटला चांगलाच गाजला. दरम्यान, २०१८साली मूळ तक्रारदाराची फिर्याद चक्क जिल्हा न्यायालयातून गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी (दि.२५) होणार असून न्यायालयाकडून निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एका ठेकेदाराचे ३ लाख ६९हजार रु पयांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विभागाने तपास करून सुमारे २ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
तपासादरम्यान, चिखलीकर यांच्याकडे १४ कोटी ६६ लाख १७ हजार ९४६ रु पयांची अपसंपदा आढळून आली. सुनावणी दरम्यान, २०१८ साली १२ जुलै रोजी न्यायालयातून लाचखोरप्रकरणातील मुळ तक्रारदाराच्या फिर्यादीची फाईल गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविला गेला आहे. मुळ तक्र ार गहाळ झाल्याने चिखलीकर प्रकरण पुन्हा उजेडात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच लाच प्रकरणातील सुनावणी पुर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले तर बचावपक्षाने थेट पुणे, मुंबई येथील वकिलांना पाचारण केले होते. सुनावणीदरम्यान सलग दोन दिवस चाललेल्या युक्तीवादात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या विविध न्यायनिवाड्यांचाही उहापोह झाला. या खटल्याचा निकाल सोमवारी लागण्याची शक्यता न्यायालयीन सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.