त्र्यंबक तालुक्यात चिकनगुनियाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:21 PM2021-03-24T23:21:14+5:302021-03-25T00:55:18+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील हरसूल गटातील जातेगाव बुद्रुक परिसरात चिकनगुनिया व डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव व परिसरात सुमारे २०० च्या वर रुग्णांना गुडघ्याला, हात व पायांना सूज येणे आदी लक्षणे दिसून आली.
या आजारांबद्दल जिल्हा किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस इरफान शेख यांनी आवाज उठविला. त्यानंतर आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा व आजाराबाबत उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली. कोणत्याही आजारासाठी तपासणी करून योग्य निष्कर्ष काढणे व त्यावर उपाययोजना करणे, काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे जातेगाव परिसरात रुग्णांना गुडघ्याला, हात-पायाला सूज येणे ही लक्षणे दिसून येत आहेत. वास्तविक त्याच वेळेस तालुका आरोग्य विभागाने त्वरित निदान व उपचाराची कार्यवाही केली असती तर दोनशेपेक्षा जास्त रुग्ण झालेच नसते.
दरम्यान, सध्या घरोघर सर्वेक्षण करणे, आपत्कालीन पथक तयार करून २४ तास सुरू ठेवणे, बाधित रुग्णांवर उपचार करणे याबरोबरच इतरही सूचना जसे की कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणी साठविण्याची भांडी कोरडी करणे अशा सूचना करण्यात आल्या. पुढील दहा दिवसांत साथ नियंत्रित होणे अपेक्षित आहे. तसेच शेजारच्या गावांमध्येही या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, गटविकास अधिकारी किरण जाधव, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, मिथुन राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, सरपंच लक्ष्मण वाघेरे, उपसरपंच हेमराज महाले, ग्रामसेवक बी. टी. सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जाधव, किरण तरवारे, दिलीप तरवारे, संजय महाले, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ. नंदकुमार नवाळे याबरोबरच आशा कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती,आरोग्य कर्मचारी आदी पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.
गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच आम्ही संयुक्त दौरा करून बरोबरीच्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी असे रुग्णांचे सर्वेक्षण करून हा प्रकार चिकन गुनियाचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. चिकनगुनिया बरा होण्यास वेळ लागतो. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य औषधाने हा आजार बरा होतो.
-डॉ. मोतीलाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी