लहान मुलांमध्ये डेंग्यूसह चिकुनगुनिया रुग्ण वाढले; ओपीडीतही मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:01+5:302021-08-21T04:18:01+5:30
नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये ...
नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार वाढले असून, बहुतांश बालरोगतज्ज्ञांच्या नियमित ओपीडीतही ऑगस्टच्या प्रारंभापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेषत्वे डेंग्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक बालकांना रुग्णालयात ॲडमिट करण्याचीही वेळ येते.
डेंग्यू हा आजार ‘डेंग्यू व्हायरस’ या आरएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो. अशा व्यक्तीला जेव्हा इडिस डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. सुमारे ४ ते ७ दिवसांनंतर या व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात. डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. त्यानंतर पहिले ३-४ दिवस ताप येतो. ४-५ दिवसांनी अंदाजे ६० टक्के लोकांना अंगावर पुरळ उठते ते गोवरासारखे दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो. सर्वसाधारणपणे ९५ टक्के रुग्णांना इतपतच त्रास होतो आणि पुढील ३-४ दिवसांमध्ये पुष्कळसे बरे वाटून दोन आठवड्यांत तो पूर्ववत दैनंदिन कामकाजास सुरुवात करू शकतो. मात्र, केवळ १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार तापानंतर ५ व्या दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करू शकतो.
इन्फो
डेंग्यूची शंका असल्यास चाचणी आवश्यक
डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्लू, सर्दी, मलेरिया, टायफाॅइड आदींसारखाच तो वाटतो, म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्तचाचण्या कराव्या लागतात. डेंग्यूच्या गंभीर लक्षणांमध्ये प्रामुख्याने कातडीवर रक्ताळलेले पुरळ, रक्तस्राव, झोप जास्त येणे, भ्रम, दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी, सूज, शरीर थंड पडणे- रक्तदाब कमी होणे या बाबींचा त्यात समावेश आहे.