बालकांच्या भोजन निधीसाठी बालगृहचालक मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
By admin | Published: January 17, 2016 10:07 PM2016-01-17T22:07:40+5:302016-01-17T22:08:43+5:30
बालकांच्या भोजन निधीसाठी बालगृहचालक मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
कळवण : नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांचे भोजन
अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे वेतन ठप्प असून, या बालकांना सांभाळणारी बालगृहे अखेरची घटका मोजत आहेत. या संवेदनशील विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील बालगृहचालक आज त्यांची भेट घेऊन साकडे घालणार आहेत.
जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्थांची २५ बालगृहे कार्यरत आहेत. यात जिल्हा बालकल्याण समिती (बाल न्यायालय)कडून सुमारे १८०० ते २००० काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके वास्तव्यास आहेत. शासनाकडून प्रतिदिन प्रतिबालक २१ रु पये अनुदान दिले जाते. बालकांना अहोरात्र सांभाळणाऱ्या २०० कर्मचाऱ्यांना तर वेतनच
नाही.
बालकांसाठीचे तुटपुंजे अनुदानही गेल्या तीन वर्षांपासून ठप्प झाल्याने संस्थाचालकांनी
उधार-उसनवारी करून बालकांचे संगोपन चालवले असताना उधारी थकल्याने धान्य, किराणा
आदिंचा पुरवठा बंद व्हायला आला आहे.
हिवाळी अधिवेशनातही भोजन निधीची पुरवणी मागणी नामंजूर झाल्याने या बालकांच्या आणि बिन पगारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर उपासमारीचे संकट घोंगावत असून, नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्नी
लक्ष घालून जिल्ह्यातील जर्जर झालेल्या बालगृहांचा भोजन अनुदानाचा व कर्मचारी वेतनाचा प्रश्न सोडवून त्यांना संजीवनी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील बालगृहचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने आर. के. जाधव, संजय गायकवाड, लक्ष्मण देवरे, परमदेव अहिरे, सुशीला अलबाड, दिलीप कांकरिया, आशीर्वाद पवार, संदीप शिंदे, शेखर गायकवाड, हरिश्चंद्र गवळी आदिंनी केली आहे. (वार्ताहर)