आईच्या खून प्रकरणी मुलास कोठडी
By Admin | Published: June 18, 2015 12:25 AM2015-06-18T00:25:21+5:302015-06-18T00:27:53+5:30
आईच्या खून प्रकरणी मुलास कोठडी
सुरगाणा : आईच्या डोक्यात लाकडी मुसळाने वार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीस मंगळवारी पोलिसांनी शिफातीने अटक केली.
तालुक्यातील मोरचोंडा येथे सावळीराम चोथवे आपली पत्नी लवंगीबाई व मुलगा राजू यांच्यासह राहातात. दि. ९ मार्च रोजी सावळीराम व लवंगीबाई यांनी कामासाठी घाटमाथ्यावर जाण्याची तयारी केली होती. मात्र मुलगा राजू याने त्यास विरोध केला.
घरी विटा पाडायच्या असल्याने तुम्ही येथेच थांबा असे त्याने आई व वडिलांना सांगितले; मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्याच दिवशी सायंकाळी तिघांचे जेवण झाल्यानंतर पुन्हा तोच विषय निघाला, यात वाद निर्माण झाला.
यावेळी राजूने लाकडी मुसळास वडील सावळीराम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आई लवंगीबाई गेली असता राजूने लाकडी मुसळाने मारलेला फटका लवंगीबाईच्या डोक्यात बसल्याने ती खाली पडून जागीच गतप्राण
झाली, तर वडील सावळीराम चोथवे गंभीर जखमी झाले होते.
आई लवंगीबाई मृत झाल्याचे पाहून राजू घरातून फरार झाला होता. घरातून जाताना त्याने सोबत दोरी नेल्याचे काही ग्रामस्थांनी
पाहिले होते. त्यामुळे तर्कवितर्क वर्तविले जात होते. काल राजू हा बर्डा (सांबरखल) येथे सासुरवाडीला येणार असल्याची वार्ता पोलीस
उपनिरीक्षक जे.डी. सोनवणे यांना मिळताच त्यांनी हवालदार खाडे, खुळे, घोरपडे, सुकदेव जाधव, अहिरे आदि कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन बर्डा गावातून रात्री पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजूला ताब्यात घेतले.
आज त्याला दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)