वारीसाठी निघालेला बाल सायकलिस्ट ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:22 AM2019-06-29T01:22:37+5:302019-06-29T01:23:28+5:30
सिन्नर : नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीत सहभागी नऊवर्षीय सायकलिस्ट प्रेम सचिन निफाडे या बालकाच्या सायकलला पाठीमागून ट्रकने धडक ...
सिन्नर : नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या सायकल वारीत सहभागी नऊवर्षीय सायकलिस्ट प्रेम सचिन निफाडे या बालकाच्या सायकलला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला. सिन्नर बायपासजवळ हॉटेल सर्वज्ञ समोर शुक्रवारी (दि. २८) सकाळी हा अपघात झाला. नाशिक ते पंढरपूर या सायकल वारीचे आयोजन केले जाते. शुक्रवारी सकाळी निघालेल्या वारीत सुमारे ७०० सायकलपटू सहभागी झाले होते. नाशिकहून निघाल्यानंतर सायकल वारी सिन्नरजवळ बायपासला पोहचली असता नाशिककडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १४ एफटी ९७८९) सायकलवर जाणाºया प्रेम सचिन निफाडे (९) रा. नारायणबापू नगर, जेलरोड, नाशिकरोड यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोके व छातीला
जोरदार मार लागल्याने प्रेम जागीच ठार झाला.
नाशिकहून सुमारे ३० किलोमीटर सायकल वारी आल्यानंतर काळाने चिमुरड्या प्रेमवर घाला घातला. सिन्नर बायपासजवळ हॉटेल उडपी येथे सायकल वारीतील पोलीस अधिकारी हरिष बैजल, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सायकलिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खाबिया, मनीषा रौंदळ यांचे एकीकडे स्वागत होत असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे सायकल वारीवर शोककळा पसरली. अपघातानंतर प्रेमचे वडील सचिन निफाडे व त्यांच्या पत्नीला सहकाऱ्यांनी सावरले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, विनोद टिळे, शहाजी शिंदे यांच्यासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
सिन्नर नगर परिषद रुग्णालयात शवविच्छेद केल्यानंतर मृतदेह नाशिकरोडकडे रवाना करण्यात आला. निफाडे कुटुंबीय व त्यांचे सहकारी नाशिकरोडकडे रवाना झाले. त्यानंतर सायकल वारी पंढरपूरकडे रवाना झाला. ट्रकचालक कृष्णा बबन राऊत रा. कणेरसर, ता. खेड, जि. पुणे याच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘प्रेम’चे सायकल वारीचे दुसरे वर्ष
प्रेम सोबत सायकल वारीत त्याचे वडील व आई सहभागी झाले होते. प्रेमचे हे सायकल वारीचे दुसरे वर्ष होते. मयत प्रेम नारायणबापूनगर नाशिक येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये तिसरी इयत्तेत शिक्षण घेत होता. शुक्रवारी पहाटे पंढरपूरकडे जाण्यासाठी तो लवकर तयार झाला होता. आई वडिलांसोबत नाशिक ते पंढरपूर प्रवास करण्यासाठी निघाल्यानंतर काळाने प्रेमवर घाला घातला.