पलंगावरून खेळताना तोल गेल्याचे चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:31 PM2019-12-07T16:31:35+5:302019-12-07T16:37:06+5:30
भाग्यश्री ही शांतीवैभव सोसायटीत सर्वांची लाडकी होती. हुशार तसेच खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे अचानकपणे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक : बालकांच्या अपघाती मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याने शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनांमागे कुटुंबियांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आठवडाभरापुर्वीच डीजीपीनगर परिसरात एक वर्षाच्या बालकाचा टबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा वासनगर भागात पलंगावरून जमिनीवर कोसळल्याने तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वासननगर परिसरातील शांती वैभव सोसायटीत राहणाऱ्या हनुवटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली भाग्यश्री ही पलंगावर खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन जमिनीवर गुरूवारी (दि.५) पडली. यामुळे फरशीचा तीच्या डोक्यास गंभीर मार लागला. जखमी अवस्थेत भाग्यश्रीला उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात कुटुंबीयांनी तत्काळ दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
आठवडभरापुर्वीच डीजीपीनगर-१च्या जवळ असलेल्या साई संतोषी मातानगर परिसरातील एका सोसायटीत चिमुकल्याचा बाथरूममध्ये पाण्याच्या टबमध्ये कलंडून पडून मृत्यू झाला होता. या घटनेने पुनरावृत्ती झाली. दोन महिन्यांपुर्वी विहितगावजवळील एका बंगल्याच्या आवारात असलेल्या भूमीगत पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.
सोसायटीत सर्वांची लाडकी
भाग्यश्री ही शांतीवैभव सोसायटीत सर्वांची लाडकी होती. हुशार तसेच खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे अचानकपणे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. भाग्यश्रीच्या अचानकपणे जाण्याने जणू या सोसायटीत भयाण शांतता पसरली होती.अवघा परिसर सुन्न झाला होता.