पित्याच्या खूनप्रकरणी मुलाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 12:54 AM2021-11-26T00:54:54+5:302021-11-26T00:57:49+5:30
आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ यास दोषी धरले असून, त्यास जन्मठेप व दोन हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नाशिक : आपल्या वडिलांसोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत वडील दुचाकी घेण्यासाठी पैसे देत नसल्याने आरोपी सिद्धार्थ भगवान एडके याने त्याचे वडील भगवान एडके यांच्या डोक्यात दगडी पाटा टाकून ठार मारले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सिद्धार्थ यास दोषी धरले असून, त्यास जन्मठेप व दोन हजारांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर परिसरात २८ मार्च २०१९ साली दुपारच्या सुमारास सिद्धार्थ एडके याने त्याचे वडील भगवान यांच्यावर संशय घेत दुसऱ्या भावांना जास्त पैसे देतात; मात्र मला मोटारसायकल घेण्यासाठी पैसे देत नसल्याचा राग मनात धरून त्यांच्या डोक्यावर दगडी पाट्याने प्रहार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले भगवान एडके यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक महेंद्र चव्हाण यांनी गुन्ह्याचा कसोशिने तपास करत सबळ पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली असता न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी आरोपी सिद्धार्थ एडके यास त्याच्या पित्याच्या खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरले. त्यास जन्मठेपेसह दोन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. चव्हाण यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे व फिर्यादी, साक्षीदार, पंचांनी दिलेली साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला.