करंजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:22 AM2018-05-08T01:22:14+5:302018-05-08T01:22:14+5:30
निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रामदास कोटकर यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात घोडा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी येथूनच जवळच असलेल्या करंजगाव भेंडाळी शिवेवर रात्री बाळासाहेब देवराम राजोळे यांच्या वस्तीवर मेंढपाळ प्रभाकर फटांगरे यांनी आपल्या कुटुंबासह कांद्याच्या शेतात राहुटी दिली होती. राहुटीच्या शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांचा ५ वर्षीय प्रसाद नावाचा मुलगा राहुटीजवळच खेळत होता. आई काही अंतरावर असताना दबा धरलेल्या बिबट्याने प्रसादला उचलून नेले. यात गंभीर जखमी झालेल्या प्रसादला तत्काळ नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वनविभागाने रात्री उशिराने पिंजरा लावला; मात्र दोन दिवसात दोन घटना घडल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुस्त वनविभाग आणि प्रशासन यांच्यामुळे निरपराध प्रसादला बिबट्याचे शिकार व्हावे लागल्याची भावना शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
बिबट्याने प्रसादला उसाच्या शेतात नेले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने आजूबाजूच्या शेतकºयांनी उसात शोध घेतला. मात्र बिबट्याने हुलकावणी देत प्रसादला दूर घेऊन गेला. त्यामुळे तब्बल अर्धा ते पाऊणतासानंतर प्रसाद जखमी अवस्थेत आढळून आला.