कानडगाव शिवारात अपघातात बालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:21 AM2021-12-18T01:21:36+5:302021-12-18T01:23:05+5:30
चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात झालेल्या अपघातात बालक ठार झाले असून, दोघे जण जखमी झाले आहेत.
चांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात झालेल्या अपघातात बालक ठार झाले असून, दोघे जण जखमी झाले आहेत. मालेगाव मनमाड रोडवर साई दर्गाच्या पुढे फरशीपुलाजवळ मुन्ना मांगीलाल बारेला (२५) रा.सेंदवा, जि.बडवाणी मध्य प्रदेश हे शिरपूर धुळेमार्गे मालेगाव येवला पाटोदा येथे मजुरीच्या कामाकरिता दुचाकी क्रमांक एम.एच.४१/ एन.बी. ७३६९ वर जात होते. त्यावेळी मनमाडकडून मालेगावकडे जाणारी कार क्रमांक एम.एच. ४१/ व्ही. १६२६ हिच्यावरील अज्ञात चालकाने कंटेनरला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यात मुन्ना मांगीलाल बारेला व सियाराम सरदार दावर यांचे डोक्यास व हाता-पायास गंभीर मार लागला. सियाराम सरदार दावर यांचा पाच वर्षांचा मुलगा छोटू सियाराम दावर ठार झाला. अशी फिर्याद मुन्ना बारेला याने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरिचंद्र पालवी हे करीत आहेत.
------------------
शिंगवे शिवारात तिघाकडून एकास जबर मारहाण
चांदवड : तालुक्यातील मतोबाचे शिंगवे शिवारात तिघांकडून एकास जबर मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मढे वस्तीजवळ चांदवड मनमाड रोडवर नवनाथ शिवमन पवार रा.उसवाड हे मनमाड येथून उसवाड येथे खासगी काम आटोपून दुचाकीवरून जात होते. आहेर नावाचे दोन व्यक्ती व बरडिया असे तिघांनी मढे वस्ती रोडच्या कडेला त्यांची दुचाकी उभी करून थांबलेले असताना, नवनाथ पवार हे जवळून जात असताना, तिघांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पवार हे थांबले नाही, म्हणून तिघांनी त्यांची दुचाकी काढून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला व थांबले, तेव्हा आमचे सात लाख रुपये दिले नाही, तर तुला बघतोच, असे बोलत असताना नवनाथ पवार हे समजावून सांगितले की, वाद न्यायालयात सुरू आहे. निकाल लागल्याशिवाय मी पैसे देणार नाही. या बोलण्याचा राग आल्याने तिघांनी नवनाथ पवार यास स्टम्पने मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी नवनाथ पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक पवार हे तपास करीत आहेत.