पालिकेला जाग आली, पण अर्धवट!
By admin | Published: December 17, 2015 12:25 AM2015-12-17T00:25:01+5:302015-12-17T00:25:30+5:30
कृषिनगर उद्यान : काम अपूर्ण ठेवून कर्मचारी माघारी
नाशिक : कृषिनगर येथील खुल्या जागेतील उद्यानात वाढलेले तण आणि तुटक्या खेळण्या याबाबत लोकमतमध्ये वृत्त येताच महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीसाठी कर्मचारी पाठविले. परंतु वर वर तण काढण्याच्या प्रकारामुळे उद्यानाची बकाल अवस्था कायम आहे. त्यामुळे पालिकेने वरवरची कारवाई करून काय साध्य केले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अर्थात, पालिकेने हे काम सुरू केले असून दोन दिवसात कृषिनगर येथे समाज मंदिर, संत ज्ञानेश्वर वाचनालय आणि दत्तमंदिर असून उद्यानही साकारले आहे. परंतु खुली जागा दिसली की उद्यान साकारायचे नंतर त्याची देखभाल दुरुस्ती करायचीच नाही, या महापालिकेच्या प्रकारामुळे शहरातील बहुतांशी उद्यानांची जी अवस्था आहे, तशीच अवस्था कृषिनगर उद्यानाची झाली.
यासंदर्भात लोकमतने उद्यानातील वाढलेले गवत, झुडपे आणि खेळण्यांची झालेली दुरवस्था यावर प्रकाश टाकला. इतकेच नव्हे तर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याची हतबलतादेखील व्यक्त केली.
यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या वतीने याठिकाणी कर्मचारी पाठविण्यात आले आणि झाडांची छाटणी करतानाच काही प्रमाणात तण काढण्यात आले. परंतु सर्व काम न करताच कर्मचारी अवघ्या काही तासातच माघारी गेल्याने उद्यानाची दुरवस्था कायम आहे. यासंदर्भात पालिकेच्या सूत्रांनी काम सुरूच राहील आणि दोन ते तीन दिवसात उद्यान सुस्थितीत राहील असा दावा केला आहे. (प्रतिनिधी)