शिक्षणासाठी बालकांचा जीवघेणा प्रवास
By admin | Published: October 2, 2016 10:32 PM2016-10-02T22:32:53+5:302016-10-02T22:36:25+5:30
दुर्लक्ष : सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची महामार्गावर कसरत
ओझर : येथील महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची दिवसातून दोनदा कसरत करावी लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या वेगामुळे बालकांचे जीवन धोक्यात आले असून, दररोज होणाऱ्या या त्रासापासून कधी सुटका होईल, असा सवाल विचारला जात आहे.
रस्त्याच्या पलीकडे असलेले सुमारे २१०० विद्यार्थी हे माधवराव बोरस्ते विद्यालय तसेच अभिनव बालविकास मंदिर व आदर्श इंग्लिश मीडियम यांचे दोन हजार विद्यार्थी तसेच नवीन इंग्रजी शाळेतले सहाशे विद्यार्थी, मराठी शाळेतले दोनशे विद्यार्थी जीव मुठीत धरून ये-जा करतात. येथील नवीन इंग्रजी शाळेजवळील असलेला भुयारी मार्ग संपूर्ण हगणदारीसाठी वापरला जात होता. मुलांना तेथून ये-जा करणे अशक्य बनले होते. आता तेथे दोन्ही बाजूस गेट बसवून पेव्हर ब्लॉकचे कामदेखील केले आहे. येथील छोट्या पुलाला कठडे नाहीत. भुयारी मार्गदेखील निरु पयोगी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी शाळेच्या वेळेत उपलब्ध असतात. परंतू ही रहदारी या दोघांच्या आवाक्याबाहेरची आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतुकीला तोंड देत विद्यार्थी शाळेत पोहोचत आहेत. अनेक वेळा येथे अपघातदेखील झाले असून, मागे अनेक दिवस या संदर्भात निवेदन देऊन झाले, मोर्चे काढण्यात आले, पत्रव्यवहार झाले, यात अनेक राजकारणीदेखील सामील झाले परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च असून, शासन अजून किती अपघातांची वाट पाहत आहे, प्रशासनास कधी जाग येईल, असा सवाल येथील पालकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)