बाबांमुळेच बालपण झाले समृद्ध
By Admin | Published: January 26, 2015 12:39 AM2015-01-26T00:39:06+5:302015-01-26T00:39:19+5:30
प्रकाश आमटे : आठवणींनी उजळली ‘अरण्यातील प्रकाशवाट’
नाशिक : ताई आणि बाबांच्या सहवासात जंगलातच आमचे बालपण गेले. त्यामुळे बालपणीच्या फारशा आठवणी नाहीत, कुणी मित्रही नव्हते आणि विरुंगळाही. त्याकाळी बाबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पाहून आणि त्यांच्यातील चर्चा ऐकून मला समाजसेवेचे बाळकडू मिळाले, बाबांमुळेच बालपणही समृद्ध झाले, असे प्रकाश आमटे म्हणाले.
सिनर्जी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अरण्यातील प्रकाशवाट’ मुलाखत कार्यक्रमात आमटे यांनी आपले आयुष्य उलगडून दाखविले. मुग्धा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रकाश आणि मंदा आमटे यांची प्रकाशवाट आठवणींनी उजळून निघाली. मुलाखत आणि चित्रफित अशा आगळ्या-वेगळ्या मुलाखत कार्यक्रमात आमटे यांना आठवणीचा गहिवर आला.
प्रकाश आमटे या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला असता मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, जेव्हा समृद्धी यांनी आपणाला आपल्या जीवनावरील चित्रपटाविषयी विचारणा केली तेव्हा आपण तिला नकार दिला होता. अशा चित्रपटावर पैसा आणि वेळ खर्च करू नको असा सल्ला आपण दिला होता; कारण असले चित्रपट कुणी पाहत नाहीत असे मी म्हटले होते. परंतु सुदैवाने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तरुणांनी हा चित्रपट पाहणे म्हणजे तरुणांना आपल्या सामाजिक जाणिवा कळायला लागल्याचे दिसून येते. मला वाटतं हे या चित्रपटाचे मोठे यश म्हटले पाहिजे.
समाजातील संवेदनशील लोक मला चांगले काम करण्याची प्रेरणा देत असतात. अनेक लोक आम्हाला आमच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करीत असतात. यावेळी मंदा आमटे यांनी संगमनेर येथील एका मदतकर्त्याचे उदाहरण दिले. मदत कुणी किती दिली यापेक्षा कोणत्या भावनेने दिली हे महत्त्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले. हेमलकसा येथे काम करण्याचे अनेक अनुभव आमटे यांनी कथन केले.
प्रारंभी सिनर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन स्रेहा रत्नपारखी यांनी केले, तर आभार सिनर्जी फाउंडेशनचे पदाधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी मानले. (प्रतिनिधी)