अंगणवाड्यातील मुले आता आधार कार्डाने जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:11 AM2019-01-29T01:11:30+5:302019-01-29T01:11:50+5:30
महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आलेल्या १३६ अंगणवाड्या सुरू करण्यासाठी अखेर सर्वेक्षण करण्यास प्रारंभ झाला असून, त्याचबरोबरच सर्वच अंगणवाड्यांच्या परिसरातील मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने बंद करण्यात आलेल्या १३६ अंगणवाड्या सुरू करण्यासाठी अखेर सर्वेक्षण करण्यास प्रारंभ झाला असून, त्याचबरोबरच सर्वच अंगणवाड्यांच्या परिसरातील मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एकच मुलगा दोन अंगणवाड्यांमध्ये नोंदविण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे. सर्वेक्षणानंतरच बंद करण्यात आलेल्या १३६ अंगणवाड्या सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या आदेशाचा आधार घेत कमी पटसंख्या असलेल्या आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प असलेल्या १३६ अंगणवाड्या बंद केल्या. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारीदेखील नोंदविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्व अंगणाड्यांंचे फेरसर्वेक्षण करावे, पटसंख्या कमी असलेल्या अंगणवाड्यांना सवलत देऊन त्या पूर्ववत सुरू कराव्या अशाप्रकारचा ठराव करण्यात आला. परंतु मुंढे यांनी त्याची दखल घेतलेली. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीनंतर विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी लोकप्रतिनिधींच्य मागणीची दखल घेतली मात्र सर्व प्रथम सर्र्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे तीस आधारकार्ड यंत्रे मागितली होती. परंतु त्यापैकी आठ यंत्रेच प्रशासन देऊ शकले. आता या यंत्रांच्या माध्यमातून सर्व अंगणवाड्यांच्या परिसरातील मुलांचे आधारकार्ड काढून घेण्याचे काम सुरू झाले आहे. काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नसले तरी नव्या शैक्षणिक वर्षातच आता अंगणवाड्यांचा फैसला होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वतीने बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे सर्वेक्षण सुरू झाले असले तरी त्यावर आयुक्त गमे तातडीने निर्णय घेणार नसून योग्यवेळीच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंढे यांनी घेतलेला निर्णय सहजासहजी बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.