बालकेही मधुमेहाच्या विळख्यात; वर्षागणिक १० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:54 PM2019-11-13T23:54:51+5:302019-11-14T00:04:11+5:30
महानगरातील बालकांमधील टाईप १ प्रकारातील मधुमेहाचे प्रमाण दरवर्षी दहा टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. तर बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या टाईप २ प्रकारातील मधुमेहदेखील खूप वेगाने वाढत असल्याने नजीकच्या भविष्यातील हा खूप मोठा धोका वेळीच ओळखून तातडीने उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे.
नाशिक : महानगरातील बालकांमधील टाईप १ प्रकारातील मधुमेहाचे प्रमाण दरवर्षी दहा टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. तर बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या टाईप २ प्रकारातील मधुमेहदेखील खूप वेगाने वाढत असल्याने नजीकच्या भविष्यातील हा खूप मोठा धोका वेळीच ओळखून तातडीने उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे.
बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली असून, पुढील काळात यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर निर्माण झाले आहे. बालकांचे मधुमेह हे दोन प्रकारांचे असतात. त्यातील टाईप १ हा जन्मत:च उद्भवलेला आजार तर टाईप २ हा जीवनशैलीशी निगडित आजार आहे. टाईप १ हा मधुमेह बालपणीच लक्षात येतो. मात्र टाईप २ श्रेणीतील मधुमेह मुलांना होऊ शकतो, ही कल्पनाच पालकांना नसल्याने त्याचे निदान व्हायला काहीसा उशीर लागतो.
गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेत अथवा घराच्या आजूबाजूला मैदानेच उरलेली नाहीत. मुले शाळेत बसून असतात. घरी आल्यावर टीव्ही, कॉम्प्युटर अथवा मोबाइल हातात घेऊन बसतात. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्याचबरोबर वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे मधुमेह होण्यासाठी सुयोग्य असे वातावरणच तयार झाले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे टाईप २ मधुमेहाच्या या आजाराला मुलांना सामोरे जावे लागत आहे.
महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्या वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत एकूणच महिलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, कौटुंबिक जबाबदारी व कामाचा ताण यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाºया बाळाला जन्मत:च मधुमेह होण्याची शक्यता बळावली आहे. हा आजार टाईप १ मध्ये येतो. तर काही घटनांमध्ये नवजात बालकाचे वजनच अत्यल्प असल्याने कमी वजन असणाºया बालकांना जास्त खायला दिले जाते. त्यामुळे त्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असल्याने नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होण्याचे प्रकारदेखील घडतात. तर टाईप २ प्रकाराचा मधुमेह होण्यामागे पालकांची निष्काळजी आणि बालकांना मनमर्जीनुसार बाहेरचे खाऊ देण्याची मोकळीक या बाबींचा सर्वात मोठा हात आहे. नियमित मैदानी खेळ आणि व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिली तरच मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. महानगरांमध्ये खेळासाठीची मैदानेच शिल्लक नाहीत. लहान वयात मैदानी खेळ न खेळल्यामुळे मुले चुकीच्या जीवनशैलीच्या आजारांना बळी पडत आहेत. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेला उपाय म्हणूनच मुले मैदानी खेळांकडे वळतात. त्याऐवजी मुलांचे आरोग्य राखण्यासाठी पालकांनी त्यांना मैदानी खेळाकडे वळविले तर त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहील. मधुमेहींच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील मधुमेहींसाठी पूरक अशी पथ्ये पाळली पाहिजेत. आरोग्यासाठी पूरक व्यायाम, सकस आहार यांचा अवलंब कुटुंबाने करायला हवा.
नाशिकच्या ६०० बालकांची नोंद
मी २०१५ साली बाल मधुमेह तज्ज्ञ म्हणून नाशकात सेवा सुरू केली, त्यावेळी माझ्याकडे ३५० बालक मधुमेहबाधित असल्याची नोंद होती. त्यात वाढ होऊन आता ही संख्या ६०० हून अधिक झाली असून, हे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. पालकांनी वेळीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. - डॉ. तुषार गोडबोले, बाल मधुमेह तज्ज्ञ