मातेच्या ट्विटने सापडली मुले
By admin | Published: January 31, 2016 11:50 PM2016-01-31T23:50:24+5:302016-01-31T23:51:08+5:30
रेल्वेमंत्र्यांची सतर्कता : झारखंडच्या मुलांचा नाशिकरोड स्थानकावर शोध
नाशिक : झारखंड राज्यातील दोन कुटुंबांमधील अल्पवयीन शाळकरी मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्याची बाब मुलीच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने मदतीसाठी थेट रेल्वेमंत्र्यांनाच ट्विटरवरून साद घातली. मदतीचा संदेश मंत्र्यांना मिळताच त्यांनी रेल्वे प्रशासनाला मुलांच्या शोधासाठी तातडीने सूचना दिल्या आणि अवघ्या काही तासांत नाशिकरोड स्थानकावर आलेल्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये सदरहू मुले आढळून आली.
रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण रेल्वेयंत्रणा कामाला लागली. त्यानुसार नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी दुपारी मुंबईला जाणारी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस रोखून यामध्ये शोध घेतला असता मुले सापडली. यावेळी एस-३० बोगीमध्ये ‘ते दोघे’ पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस चौकीत नेऊन बसविले आणि मुले मिळून आल्याचा संदेश मंत्रालयाला पाठविला.
झारखंडच्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला असलेल्या पालकाची अल्पवयीन मुलगी शाळेत शिकत असून, घरच्या कुटुंबातील ओळखीच्या कुटुंबातील एका मुलासोबत शाळेत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर थेट प्रेमामध्ये झाल्याने या दोघा अल्पवयीन मुलांनी थेट मुंबई गाठण्यासाठी घरातून कोणाला काहीही न सांगता ‘गीतांजली’ धरली. शुक्रवारी घरातून पलायन केलेल्या मुला-मुलींच्या कुटुंब चिंताग्रस्त झाले होते.
दरम्यान, मुलीच्या आईने थेट रेल्वेमंत्र्यांच्या अकाउंटला ट्विट करून मुला-मुलींच्या शोधासाठी मदतीची याचना केली. आईचा संदेश मंत्र्यांना जेव्हा पोहचला तेव्हा ‘गीतांजली’ने भुसावळ रेल्वेस्थानक सोडले होते. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाने संपूर्ण रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस खडबडून जागे झाले.
दुपारी साडेचार वाजता गीतांजली एक्स्प्रेस ही नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येताच लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण तपासणी केली. (प्रतिनिधी)