इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुले अर्थार्जनासाठी विकताय रानभाज्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:06 PM2020-08-28T23:06:36+5:302020-08-29T00:10:01+5:30
नांदूरवैद्य : देशभरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने आॅनलाइन प्रणालीनुसार शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना एवढा महाग भ्रमणध्वनी परवडणारा नसल्यामुळे या मुलांनी रानभाज्या विकणे पसंत केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली असून, आॅनलाइन शिक्षणप्रणाली सुरू करण्यात आली आहे. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा बंद असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कामांतून कुटुंबाला आधार देत आहेत.
तालुक्यातील काही भागात अनेक गाव-पाड्यातील आदिवासी मुलांकडे महागडे अॅण्ड्रॉइड मोबाइल घेण्याची ऐपत नाही, तसेच मोबाइल इंटरनेट सुविधाही नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब तसेच अॅण्ड्रॉइड मोबाइल यासारखी आधुनिक साधने कुठून येणार? यामुळे यंदा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
इगतपुरी तालुक्यातील काही आदिवासी भागातील मुले कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी रस्त्यावर रानभाज्या विकण्याचे
काम करत असल्याचे दिसत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे. यामध्ये काही शिक्षक आॅनलाइन शिक्षण उपक्रमासाठी वाड्यावस्त्यावर फिरून विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करत आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांच्या नजरा शाळा सुरू होण्याकडे लागल्या आहेत.